spot_img
spot_img

‘एआय’च्या धोक्याशी लढण्याची ताकद रामचरित मानस देईल – डॉ. कुमार विश्वास, रामकथेचा भक्तिपूर्ण वातावरणात समारोप सुमारे २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत रामकथेचा भक्तिपूर्ण वातावरणात समारोप

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-आजची तरुण पिढीच नव्हे तर एकूणच समाजमन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या मायावी समस्याशी झुंजत आहे. या तंत्रज्ञानाने अनेकांचे काम हिरावून घेतले गेले आहे. चुकीच्या व्हिडिओद्वारे समाजमन कलुषित केले जात आहे, पण या धोयातून वाचण्याचा उपाय रामकथेत आहे. तरुण पिढीने किंबहुना सर्वांनीच रामचरित मानस वाचले तर रामायण काळातील मायावी शक्तींना प्रभू रामाने कसे नेस्तनाबूत केले याचे दाखले त्यात आहेत. ते संशोधनाच्या दृष्टीने तपासले तर रामचरित मानस ‘एआय’सारख्या मायावी धोयाच्या समस्याशी लढण्याची ताकद देईल, असा विश्वास प्रख्यात व्याख्याते डॉ. कुमार विश्वास यांनी केला.

माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काका ट्रस्टच्या वतीने डॉ. विश्वास यांची ‘अपने अपने राम’ ही राम कथा आयोजित केली होती. तिचे तिसरे पुष्प गुंफून समारोप करताना डॉ. विश्वास यांनी श्रीरामाने अनेक संकटांशी झुंज देत यश मिळवताना मानवी जीवनातही संकटाशी सामना करून यशस्वी होण्याचा संदेश दिला. नगरकर भाविकांना तीन दिवस राममय करून रामकथेची अद्भूत पर्वणी दिल्याबद्दल कथाकार डॉ. कुमार विश्वास यांचा सचिन जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती देऊन विशेष सन्मान केला. डॉ. विश्वास यांनी ती मूर्ती स्वतःच्या डोयावर घेऊन भाविकांना अभिवादन केले.

राष्ट्रीय पाठशाळेच्या भव्य मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून ही रामकथा भक्तिपूर्ण वातावरणात रंगली होती. दररोज हजारो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समारोपाच्या वेळी सुमारे २५ हजार भाविक उपस्थित होते. यावेळी उपस्थित पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास हभप जंगलेशास्त्री महाराज, आमदार मोनिका राजळे, आमदार हेमंत ओगले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे, जिल्हा परिषदेचे सीइओ आनंद भंडारी, मनपा आयुक्त यशवंत डांगे, समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, श्रीमती पार्वतीबाई जगताप, उद्योजक मनीष छाजेड, मृत्युंजय नाटकाचे दिग्दर्शक नीलेश भिसे, विचार भारतीचे रवींद्र मुळे, भाजप महिला आघाडीच्या अश्विनी थोरात, उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव यांच्यासह युतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

काका ट्रस्ट व जगताप परिवाराच्या वतीने सुवर्णा जगताप, शीतल जगताप, डॉ. वंदना फाटके, राजेश भंडारी, अनिल मुरकुटे, गणेश गोंडाळ, नगरसेवक विकी जगताप, अजित जगताप, अनुप काळे, शशिकांत घिगे आदींनी सर्वांचे स्वागत केले.डॉ. कुमार विश्वास यांनी आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण केले व रामचरित मानस अभ्यास करण्याचे आवाहन केले. मरीच राक्षसाने हरणाचे रूप घेतले तर रावणाने साधू वेष घेऊन सीतेचे अपहरण केले. हे त्या काळचे मायावी ‘एआय’ तंत्रज्ञानच होते. त्यानंतर खर व दूषण या राक्षसांनी मायाजाल पसरवताना युद्धात रामाला संभ्रम येईल अशी माया केली. तेही त्या काळातील ‘एआय’चाच प्रकार होता. मात्र, प्रभू रामाने अमोघ बाणाच्या साह्याने हे मायाजाल नष्ट करत त्यांचे कोडिंग तोडून माया नष्ट केली. त्यामुळे या मागचे तंत्रज्ञान संशोधनाच्या माध्यमातून स्पष्ट केले तर आपण पण ‘एआय’सारख्या मायावी धोयाचा सामना करू शकतो, असा दावा विश्वास यांनी केला.डॉ. कुमार विश्वास यांनी रामाने कोणतेही देवत्व न दाखवता फक्त मानवी जीवनातील समस्या मिटवण्यासाठी कसा संघर्ष आवश्यक आहे हे आपल्या आदर्श जीवनातून दाखवून दिल्याचे सांगितले. त्याने वनवास स्वीकारला, काट्याकुट्यातून रस्ता काढला, पत्नीचे अपहरण झाले, बलाढ्य शत्रूशी लढताना वनवासी लोकांचे सहाय्य घेतले, शत्रूचा शरण आलेला भाऊ बिभीषणला लंकाधीश करण्याचे वचन दिले, शत्रूशी लढताना भावाचे व मित्रांचे साहाय्य घेतले आणि सर्वात महत्त्वाचे स्वत:च्या क्षमतेवर व शौर्यावर विश्वास ठेवला.

मानवी जीवनातही अशा अनेक समस्या प्रत्येकाला येतात; पण त्यामुळे हतबल न होता समर्थपणे त्यांचा सामना करण्याचा संदेश रामायणातून दिला गेला आहे, असे डॉ. विश्वास यांनी नमूद केले. सध्याच्या काळात प्रत्येकाची उपयोगिता पाहिली जाते व त्यामुळेच वृद्धाश्रम वाढत असल्याचे दुर्दैव आहे. परंतु मातापिता व साधूसंतांची उपयोगिता पाहू नये. त्यांचे अस्तित्वच नवा आत्मविश्वास देते. तुम्ही आईवडिलांसोबत राहिले नाही तर तुमची मुलेही तुमच्या समवेत राहणार नाहीत. हितसंबंध व सत्य स्वीकारण्याची वेळ आली तर सत्य स्वीकारा. स्वतः रामाने त्याच्या जीवनातून हे दाखवून दिले आहे, असे स्पष्ट करताना डॉ. विश्वास म्हणाले, घरातील मोठा भाऊ पित्यासमान व मोठी वहिनी मातेसमान असते तर धाकट्या भावाने प्रभू रामाची सावली असलेल्या लक्ष्मणासारखे असले पाहिजे. घरात देवाचे मंदिर हवे, दारूचा बार असणे हे पतन होण्याचे लक्षण आहे. दान करताना नावाचे प्राबल्य नको, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. कुमार विश्वास यांनी सीतेचे अपहरणानंतरचा जखमी झालेल्या जटायू पक्षी व रामाच्या संवादाचा प्रसंग सांगितला. यामध्ये जटायू मृत्यूनंतर स्वर्गात राजा दशरथ यांना सीता अपहरण झाल्याचे सांगू का, असे विचारले असता रामाने नकार दिला व मी शक्तिशाली कुळातील असल्याने असा पराक्रम करून रावणाला संपवेल की मृत्यूनंतर तो स्वतः दशरथ यांना मी केलेला पराक्रम सांगेन, असा आत्मविश्वास रामाने व्यक्त केला. यातून स्वतःवरचा विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नये असा संदेश प्रत्येकाने घेण्याचे आवाहन डॉ विश्वास यांनी केले. राम कथा सुरु होण्याअगोदर देशात नावाजलेल्या गायक कलाकारांनी अनेकविध सुंदर भजन सादर करून त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मंत्रमुग्ध होत भारावलेले हजारो भाविकांनी श्रीरामाचा जयघोष केला

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!