नेवासा(जनता आवाज वृत्तसेवा) :- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कारभार सध्या “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशा अवस्थेत सुरू असल्याची तीव्र चर्चा सुरू आहे. पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रभारी राजवटीमुळे मनमानी कारभाराला खतपाणी मिळत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनातील शिस्त आणि जबाबदारी बाजूला ठेवून काही अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत असल्याचे चित्र समोर येत आहे.
गुरुवारी जिल्ह्यातील एका पंचायत समिती कार्यालयात एका केंद्रप्रमुखांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम कार्यालयीन वेळेतच पार पडल्याने संताप व्यक्त होत आहे. कार्यालयात सजावट करण्यात आली, केक कापण्यात आला, तसेच काहींनी कागदी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे. सरकारी कार्यालयात, तेही कामकाजाच्या वेळेत अशा प्रकारचे वाढदिवस सोहळे कसे आयोजित केले जातात, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
शिक्षण विभागासारख्या संवेदनशील विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तीचे पालन करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे कार्यालयीन वेळेत जल्लोष साजरा होणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांपेक्षा वैयक्तिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याची टीका होत आहे.
गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रभारी कार्यकाळात अशा प्रकारच्या घटनांना उधाण आले असून, प्रशासनाचा धाक उरलेला नाही, अशी भावना अनेक शिक्षक आणि पालकांमध्ये व्यक्त होत आहे. संबंधित वाढदिवस सोहळ्याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
शासनाच्या नियमांना हरताळ फासत सरकारी कार्यालयात अशा प्रकारचा उत्सव साजरा होत असेल, तर सर्वसामान्यांनी प्रशासनाकडून शिस्तीची अपेक्षा कशी ठेवायची, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.



