spot_img
spot_img

“हप्ता न दिल्यास क्लब बंद”ची धमकी; मिरजगावात पोलीस हवालदार लाच घेताना रंगेहाथ जेरबंद

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा) :- मिरजगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई गुरुवारी पार पडली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी लोकसेवक श्री. दिपक सर्जेराव पवार (वय ३९), बक्कल क्रमांक १६२५, पोलीस हवालदार, मिरजगाव पोलीस स्टेशन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक/अहिल्यानगर यांच्याकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदाराचा मिरजगाव येथे पत्त्यांचा क्लब असून तो सुरळीत चालू ठेवण्यासाठी व त्यावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा ५ हजार रुपये ‘हप्ता’ देण्याची मागणी आरोपी पवार करत होते. तसेच पैसे न दिल्यास क्लबवर कारवाई करून तो बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर २३ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. मिरजगाव येथील क्रांती चौकातील नटराज ज्यूस सेंटर येथे आरोपीने तक्रारदारास बोलावून पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी सापळा पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात संतोष शिंदे, रविंद्र निमसे, बाळासाहेब कराड व चालक हारुन शेख यांचा समावेश होता.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाईचा इशारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!