spot_img
spot_img

वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महिलेची निर्घृण हत्या चाकू, लोखंडी रॉडने हल्ला भिंगार परिसरात खळबळ; संशयित आरोपी ताब्यात, संशयातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- भिंगार परिसरातील वडारवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयातच एका महिलेची चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मृत महिला (वय ४२) या वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. सकाळी साडेसातच्या सुमारास कार्यालय सुरू असताना संशयित आरोपी संतोष नाना धोत्रे (वय ४९) याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. डोक्यावर व गळ्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ग्रामपंचायत कार्यालयासारख्या ठिकाणीच हा प्रकार घडल्याने वडारवाडी व भिंगार परिसरात संतापाची लाट पसरली. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

दहा वर्षांच्या संबंधातून संशयाची ठिणगी

पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत महिला आणि संशयित आरोपी यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पत्नीपासून वेगळा राहत असून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, महिलेची अन्य व्यक्तीसोबत जवळीक वाढल्याचा संशय आरोपीला होता. याच संशयातून हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडून चौकशी सुरू असून, हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रमाचा अधिक तपास केला जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!