spot_img
spot_img

श्रीरामपूरच्या नगरसेवकावर गोळीबाराचा आरोप; गोदावरी पात्रातील वाळू तस्करीप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा ):-वैजापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीने शनिवारी रात्री शेतकऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात श्रीरामपूर नगर परिषदेचे नगरसेवक अर्जुन खुशाल दाभाडे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर सोपान कुंजीर (वय ४५, रा. बाभुळगावगंगा, ता. वैजापूर) हे शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी गोदावरी नदीपात्रात काही व्यक्तींची हालचाल दिसल्याने त्यांनी टॉर्चच्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी “तू आमचे लोकेशन पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना देतोस” असा आरोप करत त्यांना शिवीगाळ सुरू केली.

यानंतर आरोपींनी जालिंदर कुंजीर व त्यांच्या भावांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नगरसेवक अर्जुन दाभाडे यांनी गावठी कट्ट्यातून जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अंधारामुळे गोळ्या लक्ष्यावर न लागल्याने मोठा अनर्थ टळला. गोळीबारानंतर कुंजीर व त्यांच्या भावांनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी वीरगाव पोलिसांनी अर्जुन खुशाल दाभाडे, उद्देश अशोक मंडलीक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी बबन ढेमके, राहुल चव्हाण, विजय उर्फ भोगर भास्कर हटांगळे, मंगेश साहेबराव साळवे, विजय पवार आणि राहुत थोरात (सर्व रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भिवसने करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!