नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा):- पोलिस अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नेवाशातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्याच्या चौकशीचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे. या कार्यक्रमाबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी चौकशी करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, आता संबंधित कार्यक्रमाचा व्हिडीओ उपलब्ध नसल्याने चौकशी पुढे नेण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ‘व्हिडीओ उपलब्ध नाही म्हणून चौकशी थांबणार की अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे वस्तुस्थिती तपासली जाणार?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणी जनता आवाजने नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित सत्कार सोहळ्याचा व्हिडीओ पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओबाबत दोन-तीन पत्रकारांशीही चर्चा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडे संबंधित कार्यक्रमाचा व्हिडीओ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे व्हिडीओ उपलब्ध नसताना चौकशी नेमकी कोणत्या आधारावर पुढे न्यावी, हा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस निरीक्षकांची ही भूमिका समोर आल्यानंतर आता तपासाच्या कार्यपद्धतीबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत.
एखाद्या कार्यक्रमाचा व्हिडीओ उपलब्ध नसणे म्हणजे त्या कार्यक्रमाशी संबंधित अन्य कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असे मानता येईल का, हा मुख्य प्रश्न आहे.कार्यक्रम ज्या हॉटेलमध्ये झाला, तेथील CCTV फुटेज, कार्यक्रमाचे आयोजक, हॉटेल व्यवस्थापनाच्या नोंदी, उपस्थित व्यक्ती, छायाचित्रे तसेच सोशल मीडिया पोस्ट यांची पडताळणी करता येऊ शकते. त्यामुळे ‘व्हिडीओ नाही’ या एका मुद्द्यावर चौकशीची दिशा थांबते का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या फेसबुक पेजवर ३० जुलै रोजी एक व्हिडीओ अपलोड झाल्याची चर्चा आहे. हा व्हिडीओ संबंधित सत्कार सोहळ्याचाच आहे की अन्य कार्यक्रमाचा, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. मात्र त्या विषयी नेवाशात राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकात चर्चा सुरु आहे. या व्हिडीओमध्ये एका अभिनेत्याचा सत्कार होताना पोलिस अधिकारी दिसत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. कार्यक्रमातील जेवणावळीचे दृश्य असून सर्वत शेवटी तीन महिला एक मुला व एक व्यक्तीसह सिनेअभिनेत्याचे चित्र दिसून येत असल्याची चर्चा आहे. व्हिडीओला ‘सिंघम’ चित्रपटातील संगीत वापरण्यात आल्याचे सांगितले जात आहे.मात्र या सर्व बाबींची अधिकृत पडताळणी होणे गरजेचे आहे. व्हिडीओ संबंधित कार्यक्रमाचा असल्यास तो नेमका कधीचा आहे, कोणी शूट केला, कोणी अपलोड केला, त्याची मूळ प्रत कुठे आहे आणि संबंधित कार्यक्रमाशी त्याचा संबंध काय, हे तपासातून स्पष्ट होऊ शकते. विशेष म्हणजे व्यक्तीगत वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर मग त्याचे बिल कसे पेड झाले त्याचे काही पुरावे तपासले का असाही सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
‘व्हिडीओ कुठे आहे?’ याचा शोध महत्त्वाचा
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे एखाद्या कार्यक्रमाचे पुरावे केवळ पत्रकारांच्या मोबाईलमध्येच असतील असे नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब किंवा अन्य माध्यमांवर संबंधित कार्यक्रमाचे फोटो अथवा व्हिडीओ उपलब्ध असण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित सोशल मीडिया पोस्टची तारीख, मूळ लिंक, पोस्ट करणारे खाते आणि उपलब्ध डिजिटल सामग्रीची पडताळणी करण्याची गरज आहे. व्हिडीओ उपलब्ध नाही, असे सांगण्यापेक्षा तो नेमका कुठे आहे, कधीचा आहे आणि कोणत्या कार्यक्रमाचा आहे, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते.
सायबर तपासाची मागणी
या प्रकरणातील महत्त्वाचा भाग डिजिटल माध्यमाशी संबंधित असल्याने सायबर तज्ज्ञांची मदत घेण्याची मागणी होत आहे. संबंधित व्हिडीओ उपलब्ध असल्यास त्याची डिजिटल सत्यता, अपलोडची तारीख, मूळ स्रोत आणि कार्यक्रमाशी असलेला संबंध तपासता येऊ शकतो.त्यामुळे ‘व्हिडीओ नाही’ या कारणावर चौकशी थांबविण्यापेक्षा उपलब्ध डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न
नेवाशात सध्या राजकीय संघर्ष सुरू आहे. विविध प्रकरणांवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना पोलिस अधिकाऱ्यांची सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थिती चर्चेचा विषय बनत आहे. चर्चेत असलेल्या या सत्कार सोहळ्यात नेवाशातील एका गाजलेल्या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. ही बाब खरी असल्यास त्या व्यक्तीची उपस्थिती, कार्यक्रमाचे स्वरूप आणि संबंधित प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का, याची वस्तुनिष्ठ पडताळणी होणे आवश्यक आहे. यातून कोणत्याही व्यक्तीवर दोषारोप होत नाही. मात्र चौकशीच्या निष्पक्षतेबाबत नागरिकांच्या मनात संशय निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेणे आवश्यक आहे.
चौकशी नेमकी कुठपर्यंत?
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीचे सुरु आहे असे सांगितले होते. परंतु आतापर्यंत या प्रकरणात कोणती कार्यवाही झाली, कोणाची माहिती घेण्यात आली, कोणते पुरावे तपासण्यात आले आणि कोणते पुरावे उपलब्ध झाले नाहीत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला का? CCTV तपासले का? कार्यक्रमाचे आयोजक अथवा उपस्थित व्यक्तींची माहिती घेतली का? सोशल मीडिया सामग्री तपासली का? सायबर विभागाची मदत घेण्यात आली का? तसेच संबंधित अधिकारी त्या वेळी कर्तव्यावर होते की सुटीवर होते, याबाबत त्यांची चौकशी करून दप्तरी काही नोंद करण्यात आली का या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. चौकशी जाहीर होणे ही सुरुवात; मात्र तिचा निष्पक्ष निष्कर्ष समोर येणे ही खरी कसोटी आहे.
आता प्रशासनाने स्पष्ट करावे
या प्रकरणात ‘व्हिडीओ उपलब्ध नाही’ एवढ्यावर चौकशीची दिशा ठरविण्याऐवजी उपलब्ध सर्व संभाव्य पुराव्यांची पडताळणी झाली का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. व्हिडीओ नाही म्हणून चौकशीला ब्रेक लागणार, की उपलब्ध डिजिटल आणि प्रत्यक्ष पुराव्यांचा माग काढून सत्य समोर आणले जाणार? या प्रश्नाकडे आता नेवासेकरांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 612892