spot_img
spot_img

लोणी जवळील चंद्रापूर गावातील साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी जवळील चंद्रापूर गावातील साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी ५ वाजता घडली. मृत तिघेही लोणी येथील पायरेन्स आयबीएमए कॉलेजमध्ये एमबीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. एकाच वेळी तिघा तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून महाविद्यालयीन वर्तुळात शोककळा पसरली आहे.

आज गुरुवारी एम बी ए महाविद्यालयाचे काही विद्यार्थी चंद्रापूर परिसरातील साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी काही जण तलावात उतरले असता पाण्याखाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करत मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना बोलावले. परिसरातील स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. नागरिकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही आदिवासी तरुणांनी मदत केल्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढणे शक्य झाले मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आणि घटनेत वेळ निघून गेल्याने तिघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक गंगाधर जाधव (वय 24, राहणार सुरेगाव शिंगणापूर, तालुका नेवासा,) प्रवीण प्रभाकर रसाळ (वय 23, राहणार रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय 26, राहणार संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. तिघेही एमबीएच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. विद्यार्थ्यांचे मृतदेह प्रवरा रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेनंतर मृत विद्यार्थ्यांच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. लोणी पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!