नाशिक( जनता आवाज वृत्तसेवा) :- गुन्ह्यात आरोपी न करणे व अटक टाळून देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर यांच्यासह दोन खासगी व्यक्तींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. येवला तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप असून, लाचेपोटी ‘फोन-पे’द्वारे ५० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोपही चौकशीत समोर आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी न करणे आणि त्याला अटक न करण्यासाठी सुरुवातीला चार लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम अडीच लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक बहीर यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावतीने सुनील शिवाजी बोराडे (रा. पाटोदा, ता. येवला) याने ९ एप्रिल २०२६ रोजी तक्रारदाराकडून ‘फोन-पे’द्वारे लाचेच्या रकमेपैकी ५० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. उर्वरित रक्कम स्वीकारण्याची तयारीही त्याने दर्शविल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
तसेच जगदीश तुकाराम बोराडे (रा. पाटोदा, ता. येवला) याने तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा क्रमांक ४१०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची पडताळणी तत्कालीन पोलीस निरीक्षक पुनम केदार यांनी केली. पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा कोणत्याही लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.



