spot_img
spot_img

अहिल्यानगरात ३.९५ कोटींचे संशयास्पद बटर जप्त अरिहंत कोल्ड स्टोअरेजवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; ७५ टन साठा ताब्यात

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):-अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत शहरातील एमआयडीसी परिसरातील कोल्ड स्टोअरेजवर धाड टाकून तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये किमतीचा संशयास्पद बटरचा साठा जप्त केला आहे. कमी दर्जाचे बटर तसेच लेबलवरील माहितीमध्ये त्रुटी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार आणि नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) उ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर येथील पथकाने ही धडक कारवाई केली.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी रात्री एमआयडीसीतील गट क्रमांक २३० येथील मे. अरिहंत कोल्ड स्टोअरेज येथे अचानक तपासणी केली. या वेळी Pasteurised Cooking Butter (Unsalted) (Madurama Creamy Delight) या नावाने साठवून ठेवलेला ७५ हजार ३५६.८ किलो वजनाचा बटरचा साठा आढळून आला.

या साठ्याची किंमत ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये असून, त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

पतंजली फूड्सचा साठा असल्याचा प्राथमिक अंदाज

जप्त करण्यात आलेला बटरचा साठा प्राथमिक तपासात पतंजली फूड्स लिमिटेड या कंपनीशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार हे सहायक आयुक्त (अन्न) गौ. वि. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने भेसळविरोधी मोहीम तीव्र केली आहे. मिठाई, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच इतर व्यावसायिकांनी कमी दर्जाचे किंवा अस्वच्छ वातावरणात तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

परराज्यांतून अस्वच्छ पद्धतीने वाहतूक करून आणलेले किंवा संशयास्पद अन्न पदार्थ आढळल्यास संबंधित विक्रेते तसेच वाहतूक करणाऱ्या एजन्सींवरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) गौ. वि. जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, कि. ध. जगदाळे आणि नमुना सहायक प्र. च. कसबेकर यांच्या पथकाने केली.

नागरिकांनी अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) गौ. वि. जगताप यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!