पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी गावच्या शिवारात हॉटेल संदीपसमोर आज, गुरुवारी (दि. १०) पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि वॅगनर कारची भीषण समोरासमोर धडक झाली. या अपघातात वॅगनरमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये शकील मोहम्मद शेख (वय ४५), सलमा शकील शेख (वय ४२), इकबाल शकील शेख (वय २३) आणि सुमैय्या शकील शेख (वय १८, सर्व रा. गेट नं. ६, नुराणी मशीदसमोर, मालवणी, मुंबई) यांचा समावेश आहे.
याबाबत अल्ताफ शब्बीर शेख (वय ५२, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शकील शेख हे कुटुंबासह नातेवाईकांना भेटण्यासाठी वॅगनर कार (एमएच ४७ सीके १३०८) मधून अहिल्यानगरकडे येत होते. भाळवणी शिवारातील हॉटेल संदीपसमोर आल्यानंतर त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच १६ सीडी २७४७) ने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की वॅगनर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधील शकील, सलमा, इकबाल आणि सुमैय्या हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडले होते. स्थानिकांच्या मदतीने चौघांना तातडीने पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चौघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातानंतर आयशर टेम्पोचा चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 634446