अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील ७५३ ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्तीभोवती निर्माण झालेल्या कायदेशीर आणि प्रशासकीय कोंडीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय मागे घेत शासनाने आता संबंधित ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे रखडलेली प्रशासक नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असून, ठप्प झालेल्या ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कारभाराला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील ७५३ ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाल फेब्रुवारी-मार्चमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर प्रारंभी ग्रामपंचायतींचा कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रशासक म्हणून सोपविण्यात आला होता. मात्र, या नियुक्तीला सरपंच परिषदेने आक्षेप घेतल्याने शासनाने धोरण बदलत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे परिपत्रक काढले.
या निर्णयालाही काही ग्रामस्थांनी न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरपंचांना प्रशासक म्हणून कायम ठेवण्यास परवानगी दिली; मात्र त्यांचे आर्थिक अधिकार काढून घेतले. परिणामी, प्रशासक पदावर असूनही विकासकामे, देयके किंवा इतर खर्च करता येत नसल्याने अनेक ग्रामपंचायतींचा कारभार अक्षरशः ठप्प झाला. आर्थिक अधिकारांबाबतची न्यायालयीन सुनावणी सुरू असतानाच प्रशासक नियुक्तीची सहा महिन्यांची मुदत संपली.
या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण प्रकरणाचा फेरआढावा घेत सरपंचांऐवजी शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली.
नवीन आदेशानुसार विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (शिक्षण) तसेच अन्य पात्र शासकीय अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करता येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक होईपर्यंत किंवा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत या प्रशासकांचा कार्यकाळ राहणार आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील ७५३ ग्रामपंचायतींमध्ये नव्याने प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, दीर्घकाळ रखडलेली विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




Total Users : 632599