spot_img
spot_img

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई – पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :-आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपस्थितीत उत्सव मंगल कार्यालयात झालेल्या समन्वय बैठकीत ध्वनीप्रदूषणमुक्त, शांततापूर्ण आणि नियमबद्ध गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले. गणेश मंडप उभारणी, मिरवणूक, ध्वनीवर्धकांचा वापर, विसर्जन व्यवस्था तसेच परवानग्यांसह सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विनापरवाना डीजे, ध्वनीप्रदूषण किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या कोणालाही कायद्याची सवलत दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सणांच्या काळात शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून, गरज पडल्यास तडीपारीची कारवाईही केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच सोशल मीडियावर अफवा आणि आक्षेपार्ह संदेश पसरविणाऱ्यांवर सायबर सेलमार्फत बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवात कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत नशामुक्ती, सायबर गुन्हे, वाहतूक नियम आणि पोक्सो कायद्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेले जनजागृती पोस्टर्स सर्व गणेशोत्सव मंडळांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, ती प्रमुख ठिकाणी लावण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, विशाल खैरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, नगराध्यक्ष करण ससाणे, विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!