spot_img
spot_img

निपाणी वडगावात जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; २० जणांवर गुन्हा, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- निपाणी वडगाव (ता. श्रीरामपूर) येथील अहिल्यादेवीनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून २० जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईलसह एकूण ४ लाख ७५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने श्रीरामपूर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली.

निपाणी वडगाव शिवारातील अहिल्यादेवीनगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण पैसे लावून ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला असता दोन ठिकाणी गोलाकार बसून जुगार खेळणारे इसम आढळून आले.

पोलिसांनी १९ जणांना ताब्यात घेतले, तर जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणारा शाहीद सादिक शेख (रा. श्रीरामपूर) हा फरार झाला आहे. आरोपींकडून ९१ हजार ६२० रुपये रोख रक्कम आणि १५ मोबाईल असा ४ लाख ७५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश धोत्रे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आतार आणि विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली.

अवैध धंद्यांविरोधात एलसीबीची मोहीम तीव्र; सलग कारवायांमुळे जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!