कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात शुक्रवारी अनपेक्षित घडामोड घडली. राज्याच्या राजकारणात एकमेकांवर सातत्याने टीका करणारे भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी कर्जत नगरपरिषदेत विकासाच्या मुद्द्यावर हातमिळवणी केल्याचे चित्र समोर आले. या राजकीय समीकरणामुळे भाजपच्या छाया सुनील शेलार यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नऊ नगरसेवकांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या चार नगरसेवकांनी शेलार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. दोन्ही पक्षांचे संख्याबळ एकत्र आल्याने विरोधकांनी उमेदवारी मागे घेतली आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे कर्जत नगरपरिषदेत भाजप आणि शरद पवार गटाची स्थानिक पातळीवरील नवी सत्ता स्थापन झाली.
राज्यात भाजप आणि शरद पवार गट हे एकमेकांविरोधात राजकीय भूमिका घेत असताना, कर्जतमध्ये मात्र विकासासाठी दोन्ही नेते एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे केवळ नगराध्यक्ष निवड म्हणून नव्हे, तर बदलत्या राजकीय संकेतांच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
कर्जत शहरातील रखडलेली विकासकामे, प्रशासनातील अडथळे आणि नागरिकांची वाढती नाराजी लक्षात घेऊन हा निर्णय झाल्याची चर्चा आहे. मात्र, या हातमिळवणीमागे केवळ विकासाचा मुद्दा आहे की भविष्यातील राजकीय गणित, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
नगराध्यक्ष छाया शेलार यांनी, “रखडलेली विकासकामे पूर्ण करून कर्जतचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल,” अशी भूमिका मांडली.
दरम्यान, कर्जतमधील या नव्या समीकरणाचे पडसाद आता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. कट्टर विरोधक मानले जाणारे राम शिंदे आणि रोहित पवार यांची स्थानिक पातळीवरील ही राजकीय जवळीक केवळ नगरपरिषदेपुरती मर्यादित राहणार की भविष्यात इतर ठिकाणीही अशी समीकरणे पाहायला मिळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



