श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी श्रीरामपूर शहरात पोलिस आणि आरटीओ विभागाने संयुक्तपणे स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत ६६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. श्रीरामपूर पोलीस ठाणे, शिर्डी वाहतूक शाखा आणि आरटीओ विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी सकाळी ७.३० ते ११ या वेळेत वाहनांची तपासणी केली.
सुरक्षा साधनांसह कागदपत्रांची तपासणी
तपासणीदरम्यान विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची फिटनेस प्रमाणपत्रे, परवाना, विमा, परमिट, प्रदूषण प्रमाणपत्र, चालकाचा वाहन परवाना यांची पडताळणी करण्यात आली. तसेच वाहनांमध्ये अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजा, सीसीटीव्ही, जीपीएस सुविधा आणि वेगमर्यादेचे पालन होत आहे का, याचीही पाहणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चालकाची भूमिकाही महत्त्वाची असल्याने चालक मद्य किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवत नाही ना, याची तपासणी करण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटीचा अभाव
तपासणीत काही वाहनांमध्ये आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव आढळून आला. परवाना जवळ नसणे, प्रदूषण प्रमाणपत्र नसणे, चालकाचा गणवेश नसणे, अतिरिक्त प्रवासी वाहतूक, अग्निशामक यंत्र व प्रथमोपचार पेटी नसणे, फिटनेस प्रमाणपत्रातील त्रुटी, आपत्कालीन दरवाजाची समस्या तसेच सुरक्षित काचा व जाळीबाबत नियमभंग अशा कारणांवरून कारवाई करण्यात आली.
यापुढेही तपासणी मोहीम सुरू राहणार
श्रीरामपूर शहरात प्रथमच अशा प्रकारची व्यापक स्कूल वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. काही वाहनचालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देऊन सोडण्यात आले. मात्र, यापुढे नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही केवळ पोलिस किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून, वाहनचालक, वाहनमालक, शाळा प्रशासन आणि पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.




Total Users : 629930