spot_img
spot_img

खर्ड्यात दिवसाढवळ्या कोयत्याने वार ! दुध व्यवसायिक चालकाचा खून; जातेगाव फाट्यावरील घटनेने शहरात खळबळ

खर्डा ( जनता आवाज वृत्तसेवा):-खर्डा येथील जामखेड रोडवरील जातेगाव फाट्याजवळ आज  सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास एका दूध वाहतूक चालकावर ३ ते ४ अनोळखी इसमांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे खर्डा शहरासह परिसरात  खळबळ उडाली आहे.​तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

​घटनेचा सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअप वाहनावर (क्रमांक एमएच – १२ kp – ५६२६) चालक म्हणून काम करत होते. ते दररोज माळेवाडी येथून संकलित केलेले दूध घेऊन खर्डा येथे येत असत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी दूध घातल्यानंतर, काही अनोळखी इसमांनी बोराटे यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतले.

​प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी बोराटे यांच्याशी वाद घालत अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका इसमाने त्यांच्या मानेवर कोयत्याने सपासप वार केले. हा वार इतका भीषण होता की, तानाजी बोराटे रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तातडीने घटनास्थळावरून पळ काढला.

​घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  उज्ज्वलसिंह राजपूत हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या बोराटे यांना रुग्णवाहिकेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

​घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली असून, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) टीमला पाचारण केले आहे.

​भरदिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे खर्डा शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, हा खून कोणत्या कारणातून झाला याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. पोलीस सर्व संशयित कोनांतून तपास करत असून, फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास एपीआय उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!