घोडेगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला जलकुंभच सध्या तहानलेला असल्याचे चित्र घोडेगाव येथील उपबाजार समितीत दिसून येत आहे. जलकुंभ उभारल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यात पाणी भरण्यात आले. त्यामुळे शेतकरी, कर्मचारी आणि बाजार समितीत येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळाली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून जलकुंभात पाणी भरण्यात आलेले नसल्याने ही सुविधा आता केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली असून, बाजार समिती प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी आणि इतर खर्चाचा ताळमेळ साधताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत कांदा व जनावरे विक्रीस घेऊन उपबाजार समितीत आल्यानंतर पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत असेल, तर शेतकऱ्यांनी नेमके कुठे जायचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.




Total Users : 641290