spot_img
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आ. अमोल खताळांनी मांडल्या संगमनेरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ३३ हजार ७९२ हेक्टर खरीप क्षेत्र बाधित; तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-  संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अनियमित पाऊस आणि पावसात पडलेल्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. अनेक ठिकाणी पिके जळून जाण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मका, सोयाबीन, बाजरी यांसह विविध कडधान्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांतील पिके कोमेजली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

या परिस्थितीची आमदार खताळ यांनी गांभीर्याने दखल घेत मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पिकांची सद्यस्थिती, पावसाचा झालेला परिणाम आणि संभाव्य उत्पादनातील घट याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित विभागाला तातडीने प्रत्यक्ष पीक पाहणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे व पीक पाहणी केल्यास पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र शासनासमोर येईल. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेणे शक्य होईल, असेही आमदार खताळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आधीच वाढला आहे. त्यातच खरीप हंगामातील पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. तसेच आवश्यक त्या सवलती आणि शासनाच्या नुकसानभरपाईच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.

३३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्र बाधित

संगमनेर कृषी विभागाच्या चार कृषी मंडलांत एकूण ८३ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ३३ हजार ७९२.५ हेक्टर म्हणजेच ४०.३५ टक्के क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोकणगाव कृषी मंडलात २५ हजार ४८२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, त्यापैकी १६ हजार २०० हेक्टर (६३.५७ टक्के) क्षेत्र बाधित झाले आहे. साकूर कृषी मंडलात २२ हजार १४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्यापैकी १० हजार ३४६ हेक्टर (४७ टक्के) क्षेत्र बाधित झाले आहे.

घारगाव कृषी मंडलात १६ हजार ८०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, त्यापैकी ६ हजार १११.५ हेक्टर (३६.३६ टक्के) क्षेत्र बाधित झाले आहे. तर संगमनेर कृषी मंडलात १९ हजार ४३८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, त्यापैकी १ हजार १३५ हेक्टर (५.८४ टक्के) क्षेत्र बाधित झाले असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!