बीड( जनता आवाज वृत्तसेवा):- दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून, पिके जळून खाक झाली आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख रुपये आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही, तसेच माझ्यावर ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला जात असेल, तर तो सिद्ध करा, अन्यथा हे षड्यंत्र कोणी रचले, ते जनतेसमोर आणा, असे थेट आव्हान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
श्रीक्षेत्र नारायणगड येथे विजयादशमीनिमित्त आयोजित दसरा मेळाव्यात लाखो समाज बांधवांसमोर जरांगे पाटील बोलत होते. आपल्या सुमारे ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी मराठा आरक्षण, कुणबी नोंदी, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली.
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत, माझ्यासाठी ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा होत असल्याचा दावा केला. भाजपच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांना शिंदे यांनी मनोज जरांगेंना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत, असे सांगितले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जर खरंच पैसे दिले असतील तर ते जाहीरपणे मान्य करा आणि नसतील दिले तर तेही स्पष्ट करा. या आरोपामागे नेमके षड्यंत्र काय आहे, याचा छडा लागला पाहिजे, असेही ते म्हणाले. ५०० कोटी रुपयांची रक्कम माझ्याकडे आली असती, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली नसती का? माझ्या समाजाने आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यामुळे अशा आरोपांना घाबरणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरही जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या फेऱ्या माराव्या लागतील. कागदपत्रे, प्रवास, पेट्रोल आणि बँकेतील ये-जा यासाठीच मोठा खर्च होणार असल्याने प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात किती रक्कम उरणार, असा सवाल त्यांनी केला.
दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे सरकारने तात्पुरती मदत न देता शेतकऱ्यांना ठोस आर्थिक आधार देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून निर्णायक लढा उभारणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी शासनासमोर पाच प्रमुख मागण्या मांडल्या.
आपल्याला राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी एका माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ४० मिनिटांची गुप्त चर्चा झाल्याचा दावाही जरांगे यांनी केला. या चर्चेचे पुरावे आपल्याकडे असून योग्य वेळी ते जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मराठा समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी येत्या २२ तारखेपासून तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक सुरू करण्याची घोषणा जरांगे यांनी केली. या क्रमांकांवर फोन न करता केवळ व्हॉट्सॲपद्वारे माहिती पाठवावी, असे त्यांनी सांगितले.
२०२९ मध्ये हिशेब चुकता करा
मराठा समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांना २०२९च्या निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. जो मराठा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, त्याला मतदान करू नका. समाजाने राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची गरज आहे. मराठा समाजाने स्वतःचे नेतृत्व उभे करावे आणि अन्यायाविरुद्ध स्वाभिमानाने लढावे, असे आवाहन करत मुंबईकडे आंदोलनासाठी हाक दिल्यास प्रत्येकाने मोठ्या संख्येने सज्ज राहावे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.




Total Users : 666123