श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):-महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये कारवाई झाल्यानंतरही तक्रारदार महिला सुरक्षित आहेत का, आरोपींकडून त्यांना पुन्हा त्रास होत आहे का, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी नवरात्रीत विशेष ‘फॉलोअप ड्राइव्ह’ राबविला. या मोहिमेत मागील दोन वर्षांत गंभीर गुन्ह्यांची तक्रार केलेल्या ९१७ महिला व मुलींशी थेट संपर्क साधण्यात आला. त्यापैकी ८४६ महिलांनी पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले, तर ७१ महिलांनी आरोपींकडून अद्यापही त्रास होत असल्याचे सांगितले. या प्रकरणांतील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईसह आवश्यकतेनुसार नव्याने गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी श्रीरामपूर विभागातील १७ पोलिस ठाण्यांमधील सन २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांतील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात आली. त्यामध्ये बलात्काराचे २५१ आणि विनयभंगाचे ६६६ असे एकूण ९१७ गुन्हे नोंद असल्याचे समोर आले.
तक्रारदार महिलांशी साधला थेट संवाद
या सर्व प्रकरणांतील तक्रारदार महिलांशी महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने दूरध्वनीवरून संपर्क साधला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान आहे का, आरोपींकडून पुन्हा धमकी, पाठलाग, दबाव किंवा अन्य प्रकारचा त्रास दिला जात आहे का, याची माहिती घेण्यात आली.
या मोहिमेत ८४६ महिला तक्रारदारांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले. मात्र ७१ महिलांनी आरोपींकडून आजही त्रास होत असल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली असून संबंधित आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
महिला पथकाने राबविली मोहीम
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात या विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले. महिला पोलिस उपनिरीक्षक शीतल मुगडे, महिला पोलिस सहायक उपनिरीक्षक बेबी शिंदे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सविता उंदरे, महिला पोलिस कॉन्स्टेबल पूनम मन्तोडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल रुपाली लोहाळे, महिला पोलिस कॉन्स्टेबल शिवानी देशमुख, महिला पोलिस कॉन्स्टेबल निशिगंधा कोळसे, महिला पोलिस कॉन्स्टेबल वैष्णवी दहिटनेकर, महिला पोलिस कॉन्स्टेबल तेजल अभंग आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना अहिरे यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
‘गुन्हा दाखल करून जबाबदारी संपत नाही’
“महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत केवळ गुन्हा दाखल करून तपास पूर्ण करणे पुरेसे नाही. तक्रारदार महिला आज सुरक्षित आहे का, आरोपीकडून तिला पुन्हा त्रास होत नाही ना, याची खात्री करणेही पोलिसांची जबाबदारी आहे,” असे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
या मोहिमेत सहभागी झालेल्या ९३ टक्क्यांहून अधिक महिला तक्रारदारांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले. महिला अत्याचाराच्या जुन्या प्रकरणांतील पीडित महिलांनीही कोणतीही अडचण असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवार उपस्थित होते.




Total Users : 665498