संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-तळेगाव दिघे येथील पाणीप्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, नवीन लोकप्रतिनिधींना जाब विचारण्या पूर्वी आपल्या चाळीस वर्षांतील कारभाराचा हिशेब द्यावा, असा थेट सवाल शिवसेनेचे उत्तम दिघे यांनी उपस्थित केला आहे. तळेगावला निळवंडे धरणाच्या पाण्यापासून वंचित का ठेवण्यात आले, तसेच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्वी का सोडविण्यात आला नाही, याचे उत्तर सचिन दिघे यांनी द्यावे. असा सवाल उपस्थित करत सचिन दिघे यांना आमदार . अमोल खताळ पाटील यांच्यावर टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याची टीका उत्तम दिघे यांनी केली.
तळेगाव दिघे येथे पूर्वी आठ ते दहा दिवसांनंतर पिण्याचे पाणी उपलब्ध होत होते. नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना हा मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले, असा सवाल उत्तम दिघे यांनी केला. आमदार अमोल खताळ पाटील यांनी या तळेगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या माध्यमातून भागवतवाडी येथील गायत्री प्लांटपासून तळेगाव साठी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करून तळेगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दिशेने पाऊल टाकून तो कायमस्वरूपी सोडावीला असेही उत्तम दिघे यांनी
तळेगावच्या पाणीप्रश्नावर नवीन लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी मागील काळातील कारभाराचा विचार करावा. माजी आमदारांनी दीर्घकाळ सत्ता उपभोगल्यानंतरही तळेगावचा पाणीप्रश्न प्रलंबित का राहिला? गावातील सुमारे ९० टक्के भाग निळवंडेच्या पाण्यापासून वंचित का राहिला? हे प्रश्न सचिन दिघे यांनी माजी आमदारांना विचारण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान उत्तम दिघे यांनी दिले. लोकप्रतिनिधींना जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर जाब विचारणे आवश्यकच आहे. मात्र, त्याचवेळी पूर्वीच्या काळात या प्रश्नांवर काय काम झाले आणि प्रश्न सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले, याचाही आढावा घेतला पाहिजे. केवळ नव्या लोकप्रतिनिधींवर टीका करण्यापेक्षा पूर्वीच्या कारभाराचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याची स्पष्ट भूमिका दिघे यांनी मांडली.
भोजापूर चारीच्या कामावरूनही सवाल
भोजापूर चारीच्या कामाचा मुद्दा उपस्थित करत उत्तम दिघे यांनी तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भोजापूरचे काम कारखान्याने केले असेल, तरी जलसंधारणासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींना साधा निधीही आणता आला नाही का, असा सवाल उपस्थित करणाऱ्या सचिन दिघे यांनी भोजापूरच्या नावाखाली कारखान्यातून किती कोटी रुपये काढण्यात आले, याची माहिती घ्यावी, तसेच भोजापुर चारीच्या कामासाठी संगमनेर साखर कारखान्याची यंत्रणा वापरली असे तुम्ही म्हणत असाल तर साखर कारखाना हा ऊस उत्पादक सभासद यांच्या मालकीचा आहे तो काही कोणाच्या मालकीचा नाही त्यामुळे सभासदांच्या मालकीच्या कारखान्यातून खर्च केला तर बिघडलं काय असाही सवाल उत्तम दिघे यांनी उपस्थित केला
सुमारे दोन वर्षांपूर्वी भोजापूर चारीच्या दुरुस्तीचे टेंडर कोणाला मिळाले होते आणि संबंधित ठेकेदाराने प्रत्यक्षात कोणते काम केले, याची माहिती सचिन दिघे यांनी आपल्या ठेकेदार मित्राकडून घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला. चारीच्या दुरुस्तीवर झालेला खर्च, प्रत्यक्षात करण्यात आलेले काम आणि कामाची गुणवत्ता याबाबत सखोल माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणीही उत्तम दिघे यांनी केली.
गावाच्या पाणीप्रश्नासाठी कार्यकर्त्यांनी आवाज का उठविला नाही?
तळेगावला पाणी मिळण्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांसाठी माजी आमदारांइतकेच सचिन दिघे यांच्यासारखे कार्यकर्तेही जबाबदार असल्याचा आरोप उत्तम दिघे यांनी केला. कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे वैयक्तिक कामांसाठी पाठपुरावा केला; मात्र गावाच्या पिण्याच्या पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेण्याचे धाडस दाखविले नाही, अशी टीका त्यांनी केली.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून, त्याकडे राजकीय सोयीच्या दृष्टिकोनातून न पाहता जनहिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. तळेगावच्या नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना पूर्वीच्या काळात या प्रश्नावर आवाज का उठविण्यात आला नाही? गावाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी संबंधितांनी काय प्रयत्न केले? या प्रश्नांची उत्तरे सचिन दिघे यांनी जनतेसमोर द्यावीत, असे आवाहन उत्तम दिघे यांनी केले.
तळेगावच्या पाणीप्रश्नावरून सुरू झालेल्या या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे आता माजी आणि विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, या साऱ्या राजकीय चर्चेत तळेगावच्या नागरिकांना नियमित आणि पुरेसे पिण्याचे पाणी मिळणे, हाच सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न असल्याचे चित्र आहे.
भोजापूर आणि नदीजोड प्रकल्प हे केवळ निवडणुकीचे मुद्दे नसून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी देण्याचे ठोस उपाय आहे. महायुती सरकारमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचे आमदार अमोल खताळ पा. यादृष्टीने काम करत असल्याचे शिवसेनेचे शाखा खजिनदार दत्तात्रय दिघे यांनी सांगितले




Total Users : 663997