अहिल्यानगर ( जनता आवाज वृत्तसेवा):- पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याने अवघ्या दीड वर्षाच्या जागृती बेलेकर या बालिकेचा एक डोळा निकामी झाला व तिच्या जीवावर बेतले होते. पण विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर शासकीय खर्चाने उपचार झाले व तिची दृष्टी परत आली आणि जीवही वाचला. जामखेड शहरातील बेल्हेकर वस्ती येथील ही बालिका आहे. तिच्यावरील उपचारांसाठी मदत करण्यास पुढाकार घेतल्याबद्दल बेल्हेकर परिवाराने प्रा. शिंदेंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, जामखेड येथील बेल्हेकर वस्ती येथील जागृती सौरभ बेलेकर हिला पिसाळलेला कुत्रा चावल्याने डोळ्यांना दुखापत होऊन शास्त्रक्रिया करावी लागली. तिचे वडील सौरभ बेलेकर हे शेतमजूर असल्याने ऑपरेशनचा खर्च करू शकत नव्हते. त्यामुळे दीड वर्षाच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी, असा मोबाईल मेसेज विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना तिच्या कुटुबीयांनी केला होता. त्याची त्यांनी तातडीने दखल घेतली व तात्काळ पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे संपर्क करून जागृतीवरील सर्व उपचारांसाठी शासकीय मदत मिळवून दिल्याने निकामी होण्याची शक्यता असलेला जागृतीचा डोळा पूर्ववत झाला व तिला पुन्हा दृष्टीही मिळाली. तसेच कुत्र्याच्या हल्ल्याने झालेल्या जखमाही बर्या होऊन तिला जीवनदान मिळाले. उपचारानंतर ती आता डोळ्याने पाहत असून कुटुंबाने याबद्दल सभापती प्रा. शिंदे यांचे आभार मानून पुढील उपचारासाठीही मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. तशी ग्वाहीही प्रा. शिंदे यांनी दिली आहे. याबद्दल बोलताना प्रा. शिंदे यांनी एका चिमुकलीचा जीव वाचवता आला, यापेक्षा मोठं समाधान नाही, अशी भावना व्यक्त केली.
जागृतीवर कुत्र्याचा हल्ला होण्याची घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली. आई भांडी धुण्यासाठी घराच्या पुढील बाजूस पाणी आणण्यास गेली असताना, त्यावेळी घराच्या पाठीमागे खेळणार्या जागृतीवर पिसाळलेल्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. तिला चावा घेतला व नखाने ओरबाडले. यात तिच्या डाव्या डोळ्यातील बुबुळ बाहेर आले, रक्तस्त्राव सुरू झाला. कुटुंबीयांनी तिला तातडीने जामखेडच्या रुग्णालयात नेले, पण तेथे उपचार होत नसल्याने नगरला आणले. पण तेथेही उपचार होण्यास अडचण असल्याने तातडीने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. तेथे शस्त्रक्रिया उपचारांसाठी सुमारे दोन लाखावर खर्च असल्याने शेतमजूर कुटुंबाने सभापती प्रा. शिंदेंकडे मदत मागितली. त्यांनीही तातडीने शासकीय यंत्रणेला सूचना देऊन तिच्यावरील उपचार मार्गी लावले व भविष्यातही तिच्यावरील आवश्यक उपचारांसाठी मदत देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, उपचारांनंतर जागृती पुन्हा डोळ्यांनी पाहू शकत आहे, ही बातमी मनाला मोठा आनंद आणि समाधान देणारी आहे, अशी भावनाही प्रा. शिंदे यांनी व्यक्त केली. तिच्या चेहर्यावरचं निरागस हसू असंच कायम राहावं आणि तिचं भविष्य आनंदाने उजळून निघावं, अशी शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केली.
–




Total Users : 663464