spot_img
spot_img

महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण विकासात सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी आनंद भंडारी

अहिल्यानगर,(जनता आवाज वृत्तसेवा) :-  उमेद अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींनी (CRP) गावपातळीवर महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. बचत गटांमधील महिलांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात तसेच ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. गावाच्या विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढल्यास ग्रामीण विकासाला अधिक गती मिळू शकते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत उमेद अभियानात कार्यरत ग्रामसखींसाठी ‘ग्रामसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 14 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण सार्वजनिक सभागृह, अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, महिला बचत गटांचा विस्तार आणि ग्रामपंचायत व्यवस्थेतील महिलांचा सहभाग या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रकल्प संचालक मंजूषा ठवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नवीन 20 हजार महिला बचत गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामसखी व समुदाय संसाधन व्यक्तींनी विशेष प्रयत्न करावेत. अधिकाधिक महिलांना उमेद अभियानाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना विविध शासकीय योजना, आर्थिक संधी आणि स्वयंरोजगाराचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही श्री. भंडारी यांनी केले.

उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) आणि एनपॅनलमेंट प्रक्रियेच्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विपणन विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, जिल्हा परिषद, अहिल्यानगरच्या माध्यमातून विविध उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती श्री. भंडारी यांनी दिली. या पुस्तिकेमुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी आणि आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

दादाभाऊ गुंजाळ यांनीही ‘उमेद अभियान आणि ग्रामविकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे संघटन, स्थानिक संसाधनांचा वापर, स्वयंरोजगाराच्या संधी आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याबाबत त्यांनी आपले विचार मांडले.

उमेद अभियानाच्या माध्यमातून समुदाय संस्थांचे बळकटीकरण, समुदाय संसाधन व्यक्तींची भूमिका आणि अभियानापुढील उद्दिष्टे याबाबत जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसखी व समुदाय संसाधन व्यक्तींनी गावपातळीवर शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रकल्प संचालक मंजूषा ठवकर यांनी उमेद अभियानांतर्गत निर्धारित करण्यात आलेली विविध उद्दिष्टे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामसखी व समुदाय संसाधन व्यक्तींनी अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. महिला बचत गटांचा विस्तार, महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समुदाय संसाधन व्यक्तींचा प्रकल्प संचालक श्रीमती मंजूषा ठवकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ग्रामसखी व समुदाय संसाधन व्यक्तींना अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

कार्यक्रमात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) अधिकाऱ्यांनी ‘विमासखी’ योजनेविषयी माहिती दिली. महिलांना विमा क्षेत्रातील संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगाराच्या उपलब्ध पर्यायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या ग्रामसंवाद कार्यक्रमाला जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून जवळपास 800 समुदाय संसाधन व्यक्ती व समुदाय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महिला बचत गटांचे सक्षमीकरण, ग्रामीण भागातील उद्योगांना चालना, महिलांचा ग्रामपंचायत व ग्रामसभांमधील सहभाग आणि उमेद अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!