संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची परंपरा भक्तिभावाने जपली जात आहे. घुलेवाडी येथील साई स्वराज्य ग्रुपच्या वतीने दरवर्षी वणी येथील आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन पायी ज्योत आणली जाते. या पायी ज्योतीचे कारखाना गेट येथे आगमन झाल्यानंतर माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्योतीचे दर्शन घेऊन स्वागत केले. नवरात्र उत्सव हा भक्ती शक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी म्हटले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर गुंजाळवाडी व घुलेवाडी येथील युवकांनी आणलेल्या पायी ज्योतीचे पूजन व स्वागत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पायी ज्योत आणण्याच्या या धार्मिक उपक्रमातून युवकांमध्ये श्रद्धा, भक्तिभाव आणि एकतेची भावना निर्माण होते. शारदीय नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असून, अशा धार्मिक उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन होते. महाराष्ट्रामध्ये तुळजापूर,कोल्हापूर, माहूर आणि सप्तशृंगी गड हे शक्तिपीठे आहेत. भारतीय परंपरेमध्ये महिलांना मोठे आदराचे स्थान आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर होतो. संगमनेर तालुक्यामध्ये गावोगावी देवीचे मंदिर आहेत. तालुका हा अध्यात्म आणि पुरोगामी विचार जपणारा तालुका आहे. सर्व लोक एकत्र येऊन सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात.
याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक गावांमधून देवीचे मंदिर असून गावोगावी महिला भगिनी एकत्र येऊन मोठा आनंद उत्सव साजरा करतात. हा काळ आनंदाचे परवा असतो. सणासुदीचा काळ असतो. यावर्षी दुष्काळाचे मोठे संकट आहे. आहे ते पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. जगदंबा मातेच्या कृपेने उर्वरित काळात पाऊस होऊन सर्वांना दिलासा मिळू दे याचबरोबर सर्व नागरिक सुखी समाधानी व आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. यानंतर युवकांनी श्रद्धा आणि उत्साहाने जपलेली ही परंपरा कौतुकास्पद असल्याचे सांगून सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.




Total Users : 662987