कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार येथील बेलापूर चौकात रात्रीच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील डोरले हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांपैकी एकाला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. दुसरा संशयित मात्र गर्दीचा फायदा घेत पसार झाला. पकडलेल्या संशयिताला काही ग्रामस्थांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच मध्यस्थी करून त्याला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बेलापूर चौक परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास भाजीपाला व्यावसायिक शोभा प्रविण देशमाने या आपल्या सासूसोबत घराकडे जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील डोरले हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. डोरले हिसकावल्यानंतर दोन्ही संशयित मोटारसायकलवरून बेलापूर चौकाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शोभा देशमाने व त्यांच्या सासूने आरडाओरडा केला. आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यामुळे संशयितांची चांगलीच फजिती झाली. ग्रामस्थांनी पाठलाग करून एका संशयिताला पकडले, तर दुसरा गर्दीचा फायदा घेत पसार झाला.
संशयिताला पकडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांचा मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला. काही ग्रामस्थांनी त्याला मारहाण केली. परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने संकेत संजय खर्डे यांनी वेळीच मध्यस्थी करत संशयिताला आपल्या ताब्यात घेतले. तर एका पत्रकार यांनी ग्रामस्थांना समजावल्या नंतर पोलिसांशी संपर्क साधून त्याला लोणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांपैकी एकाला पकडण्यात यश आले. पसार झालेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, या घटनेचा पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.
घटनेमुळे कोल्हार – बेलापूर चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच पोलिसांच्या ताब्यात संशयित देण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
सतर्कता ठरली निर्णायक!
महिलेच्या आरडाओरडामुळे परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यामुळे चेन स्नॅचिंगचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाला पकडण्यात यश आले. नागरिकांची सतर्कता आणि वेळीच एका पत्रकार यांनी पोलिसांना माहिती दिली यामुळे पुढील अनर्थ टळला.




Total Users : 661570