spot_img
spot_img

प्रभावी अभिव्यक्तीचा नटसम्राट हरपला” नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अढळ स्थान निर्माण करणारे, आपले विलक्षण अभिनय सामर्थ्य आणि शेतकऱ्यांप्रती संवेदना असणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनाला तीव्र वेदना झाल्या आहेत. जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मंत्री विखे पाटील यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “नानांचा अभिनय म्हणजे सहजता, वास्तववाद आणि प्रभावी अभिव्यक्तीचा अनोखा संगम होता. ‘नटसम्राट’ असो की ‘क्रांतीवीर’, त्यांच्या भारदस्त आवाजाने आणि वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकीने भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळी उंची मिळवून दिली. त्यांच्या अनेक भूमिका आणि संवाद पुढील कित्येक पिढ्यांच्या स्मरणात राहतील.

नाना पाटेकर यांच्याशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा देताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, नानांशी त्यांचे अत्यंत आपुलकीचे आणि मैत्रीचे ऋणानुबंध होते. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कृषी आणि जलक्षेत्रातील कामाप्रती नानांना नितांत आदर होता आणि त्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती. मनात असेल ते स्पष्टपणे बोलणारा, कोणताही दिखाऊपणा न करता माणुसकी जपणारा आणि सामाजिक प्रश्नांबद्दल तळमळ बाळगणारा हा माणूस नेहमीच भावल्याचे त्यांनी नमूद केले.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या भेटीत, राज्यात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामात तसेच दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या प्रयत्नांमध्ये स्वतःहून योगदान देण्याची तयारी नानांनी दर्शवली होती. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाची कामे आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलेला मदतीचा हात यातून त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती सतत येत राहिली. प्रसिद्धीच्या झगमगाटापलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या वेदनांशी एकरूप होणारा हा कलावंत खऱ्या अर्थाने माणुसकीचा चेहरा होता, असे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.

नानांच्या निधनाने भारतीय कलाविश्वातील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले असून त्यांचे कलाक्षेत्रातील योगदान, समाजकार्य आणि स्नेहबंधांच्या आठवणी कायम हृदयात जपल्या जातील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!