श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):-शहरातील बेलापूर रोड परिसरात देखावा सादर करणाऱ्या मंडळाच्या कार्यक्रमात वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. देखावा पाहण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी कलाकारांना त्रास दिल्यानंतर झालेल्या वादातून मंडळाच्या सदस्यांवर लाकडी काठ्या आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याची तक्रार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी पाच जणांसह अन्य तीन जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास बेलापूर रोडवरील ममता एजन्सीसमोर, वार्ड क्रमांक सात परिसरात घडली. या प्रकरणी सौरभ सुनील कालकुंद्री (वय ३०, रा. साईसिद्धी अपार्टमेंट, मोरगेवस्ती, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
कलाकारांना त्रास दिल्याने वाद
फिर्यादी आणि मंडळाचे सदस्य नेहमीप्रमाणे देखावा सादर करीत असताना आरोपी तेथे पाहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी देखाव्यातील कलाकारांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंडळाच्या सदस्यांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले.
त्यानंतर काही वेळाने संबंधित आरोपी लाकडी काठ्या घेऊन पुन्हा तेथे आले आणि मंडळाच्या सदस्यांसह कलाकारांना मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीसह कलाकार जखमी
घडलेला प्रकार सोडविण्यासाठी सौरभ कालकुंद्री हे मध्ये गेले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी काठ्यांनी मारहाण केली. यातील एका आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्या कपाळावर, डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ आणि नाकावर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीला वाचविण्यासाठी गेलेले देखाव्यातील कलाकार निलेश जोंधळे यांच्याही डाव्या हाताच्या बोटाजवळ धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याचे सांगण्यात आले आहे.
मारहाणीच्या वेळी आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन तोडून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच “आमच्या नादी लागले तर कोणालाही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सचिन बाजीराव धोत्रे, हर्षल शिंदे, प्रशांत शिंदे, राहुल फुलारे, शुभम धोत्रे आणि अन्य तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदार प्रशांत रणनवरे हे तपास करीत असून, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पुन्हा एकदा समोर आले आहे.
गुन्हा दाखल
आरोपी : सचिन धोत्रे, हर्षल शिंदे, प्रशांत शिंदे, राहुल फुलारे, शुभम धोत्रे व अन्य तीन जण.
गुन्ह्याची कलमे :
बीएनएस कलम ११९(१), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, १८९(२), १९१(१), १९१(२), १९१(३).




Total Users : 664330