श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील पढेगाव येथे विवाहितेच्या आत्महत्येनंतर अंत्यविधीच्या वेळी तणाव निर्माण झाला. सुकन्या विशाल घोडे (वय २३) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर माहेर व सासरच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर गोंधळात झाले असून, पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
मयत सुकन्या यांच्या आई मीनाक्षी देवकर (वय ५०, रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत पती, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांकडून हुंडा तसेच माहेरहून जमीन घेण्यासाठी पैशांची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
सुकन्या यांचा विवाह अडीच वर्षांपूर्वी पढेगाव येथील विशाल अंबादास घोडे यांच्याशी झाला होता. त्यांना सव्वा वर्षाचा मुलगा आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार त्रास दिला जात असल्याचे सुकन्या यांनी आईला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१८ ऑक्टोबर रोजी सुकन्या यांनी आईला फोन करून सासरच्या त्रासाबाबत माहिती दिली होती. “मला आता जगण्याची इच्छा राहिली नाही,” असे त्यांनी सांगितल्याचे आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी सुकन्या यांनी राहत्या घरातील वरच्या खोलीत गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांचे पती विशाल घोडे हे मुलाच्या उपचारासाठी वाहन काढण्यासाठी गेले असताना वाहन पंचर असल्याने ते दुरुस्तीसाठी बाहेर गेले होते. त्याचवेळी ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
अंत्यविधीवरून वाद; घराची तोडफोड
घटनेची माहिती मिळताच सुकन्या यांच्या माहेरचे नातेवाईक मोठ्या संख्येने पढेगाव येथे दाखल झाले. अंत्यविधीच्या ठिकाणावरून दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये वाद निर्माण झाला. परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती हाताळली.
पोलिस बंदोबस्तात रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले. मात्र, या वेळी झालेल्या गोंधळात घोडे यांच्या घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. घरातील सीसीटीव्ही कॅमेरे, विविध वस्तू आणि साहित्याचे नुकसान झाले असून काही किमती ऐवज गहाळ झाल्याची चर्चा परिसरात आहे.
या घटनेत प्रत्यक्ष कुटुंबीयांपेक्षा बाहेरील काही व्यक्ती अधिक आक्रमक झाल्याची चर्चा असून, तोडफोड करणाऱ्यांची भूमिका तपासण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, घोडे यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची चर्चा पसरल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार, यांनी अतिशय तत्परता दाखवत ही परिस्थिती हाताळली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील अनुचित प्रकार टाळला. सुकन्या घोडे आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे.
रुग्णवाहिका डिझेलअभावी बंद
दरम्यान, वादात जखमी झालेल्यांना उपचारासाठी नेत असताना पढेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका डिझेल संपल्याने रस्त्यातच बंद पडल्याचा प्रकार घडला.
चालकाने बेलापूर येथून डिझेल आणल्यानंतर रुग्णवाहिका पुन्हा सुरू झाली. आपत्कालीन सेवेसाठी असलेल्या वाहनातच इंधन उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.




Total Users : 666122