अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील जागांचा आढावा घेऊन स्थानिक पातळीवर समन्वय साधला जात आहे. ज्या ठिकाणी अडचणी आहेत, तेथे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती बँकेचे सभापती राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार तसेच सहकार क्षेत्रातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्वानुमते भूमिका घेण्यात आली. मात्र, काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील मतभेदांमुळे अपेक्षेपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे आता अर्ज माघारीच्या टप्प्यात सर्वांना विश्वासात घेऊन मतभेद दूर करण्यावर भर दिला जात असल्याचे सभापती राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत माहिती देताना राम शिंदे म्हणाले की, सध्या सर्व तालुक्यांमध्ये चर्चा करून प्रत्येक मतदारसंघातील जागांचा आढावा घेतला जात आहे. या चर्चेत एकूण सात जागांचा तसेच तालुका प्रतिनिधींच्या १४ जागांचा उल्लेख करण्यात आला. अनेक ठिकाणी जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी अडचणी आहेत, तेथे संबंधितांशी चर्चा करून त्या सोडविण्याचा आणि बिनविरोध निवडणुकीचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती वेगळी असल्याने अंतिम निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेऊनच घ्यावा लागणार आहे.
प्रत्येक तालुक्यातील स्थानिक नेते, प्रभावशाली व्यक्ती आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांना सहकार्य करावे, अशी भूमिका या चर्चेतून पुढे आली आहे. ज्या ठिकाणी संबंधित नेतृत्वाचा प्रभाव आहे, तेथे त्या नेतृत्वाने समन्वय साधून बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करावे, असेही चर्चेत ठरल्याचे राम शिंदे यांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवर निवडणूक बिनविरोध करण्याबाबत एकमत असले, तरी प्रत्यक्षात उमेदवारांनी माघार घेणे आणि स्थानिक पातळीवरील मतभेद दूर होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेतला असला, तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत स्थानिक राजकीय समीकरणे आणि उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सभापती राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, तालुकानिहाय चर्चा आणि समन्वयातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना अंतिम टप्प्यात कितपत यश मिळते, याचे चित्र अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, खा. निलेश लंके, माजी खा. सुजय विखे पाटील, आ. प्राजक्त तनपुरे, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. किरण लहामटे, आ. हेमंत ओगले, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते, आ. विवेक कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी व उमेदवार उपस्थित होते.
ना. विखे पाटलांच्या घोषणेकडे लक्ष
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्यापूर्वी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यानंतर संबंधित उमेदवारांनी निर्धारित वेळेत अर्ज मागे घेतल्यास बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. त्यामुळे आज दुपारी तीन वाजेपर्यंत कोणकोणते उमेदवार माघार घेतात आणि किती जागा बिनविरोध होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 666123