spot_img
spot_img

शॉर्टसर्किटचा फटका; माळवाडगावात २० एकरांवरील ऊस जळून खाक एकाच ट्रान्सफॉर्मर परिसरात पुन्हा आग; पंचनामा करून नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी

माळवाडगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे बुधवारी (दि. २१) दुपारी लागलेल्या आगीत सुमारे १५ ते २० एकरांवरील ऊस जळून खाक झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या दुर्घटनेत अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आग लागलेल्या परिसरात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर असून, याच ठिकाणी यापूर्वीही उसाला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ट्रान्सफॉर्मर व वीज यंत्रणेची सखोल तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी वीजवाहक तारा खाली लोंबकळत असल्याने संभाव्य अपघातांचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी वाहनांनाही या तारांचा स्पर्श होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वर्षभर कष्ट करून उभे केलेले ऊसपीक काही क्षणांत आगीत भस्मसात झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जळालेल्या क्षेत्राचे अधिकृत मोजमाप अद्याप झाले नसले, तरी प्राथमिक माहितीनुसार १५ ते २० एकरांहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याची शक्यता आहे.

या आगीत भागचंद आण्णासाहेब आसने, बाळासाहेब दत्तात्रय आदिक, द्वारकाबाई बाळासाहेब आदिक, आदिनाथ कडूबा आसने, विजय दत्तात्रय आदिक, निर्मला विजय आदिक, सुनील गोरक्षनाथ आसने आणि नितीन गोरक्षनाथ आसने या शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे.

वारंवारच्या आगीने शेतकरी धास्तावले

माळवाडगावातील संबंधित ट्रान्सफॉर्मर परिसरात यापूर्वीही उसाला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महावितरणने या वीज यंत्रणेची तातडीने तपासणी करून दोष दूर करावेत. अन्यथा भविष्यात आणखी मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!