शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाने शिर्डी-पिंपळवाडी मार्गावरील रुई शिवारातील हॉटेल न्यू सनराजवर धडक कारवाई करत मध्यप्रदेश निर्मित तसेच महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित देशी-विदेशी मद्य व बिअरचा मोठा साठा जप्त केला. पुढील तपासात आणखी मद्यसाठा हस्तगत झाल्याने या प्रकरणात ६ लाख ९९ हजार ७२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक (अहिल्यानगर-२) ऋषिकेश इंगळे आणि उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने रुई शिवार (ता. राहाता) येथील हॉटेल न्यू सनराज येथे छापा टाकला. या कारवाईत विवेक ऊर्फ जयनारायण मिसर (रा. गणेशवाडी, शिर्डी) याच्या ताब्यातून मध्यप्रदेश निर्मित विदेशी मद्य, महाराष्ट्र निर्मित विदेशी मद्य, बिअर, देशी दारू, एमएच-१४ डीएफ-८४०३ क्रमांकाची मारुती सुझुकी इर्टिगा आणि अॅपल कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला राहाता न्यायालयात हजर केले असता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तपासादरम्यान करडोबानगर (ता. राहाता) येथे आरोपीने लपवून ठेवलेला १ लाख ३२ हजार ८४८ रुपयांचा मध्यप्रदेश निर्मित मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. त्यानंतर आरोपीचा भाऊ सचिन जयनारायण मिसर आणि हॉटेलमधील कामगार विलास खंडेराव थोरात यांच्यावरही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत रॉयल स्टॅग, इम्पिरियल ब्ल्यू, आयकॉनिक व्हाइट, ब्लेंडर्स प्राईड, सिग्नेचर, ओकस्मिथ गोल्ड, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स, ओल्ड मंक, ब्लॅक बकार्डी, मॅजिक मोमेंट, किंगफिशर, ट्युबॉर्ग, बडवायझर तसेच भिंगरी संत्रा देशी दारूसह विविध नामांकित ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
निरीक्षक एस. एस. हांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत दुय्यम निरीक्षक एम. सी. मांडवेकर, सहायक दुय्यम निरीक्षक जी. जी. ठुबे, कर्मचारी विजय पाटोळे, सचिन बटुळे, प्रवीण सागर, ओमकार पालवे, उद्धव काळे, शुभम लवाडे तसेच महिला जवान रत्नमाला काळापहाड, गायत्री ढेपले आणि भक्ती काळे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत गायकवाड करीत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी मद्याची खरेदी केवळ परवानाधारक दुकानातून करावी. तसेच अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीची माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर अथवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. अवैध मद्यविक्री, वाहतूक आणि बेकायदा ढाब्यांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.




Total Users : 669163