श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- महिला आणि मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत श्रीरामपूर विभाग पोलिसांनी राबविलेल्या अभिनव उपक्रमाचे राज्यस्तरावर कौतुक झाले आहे. नवरात्री उत्सवादरम्यान मागील दोन वर्षांतील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिलांशी थेट संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली. या संवेदनशील उपक्रमाची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दखल घेत पोलिस प्रशासनाचे अभिनंदन केले.
महिला सुरक्षेसाठी केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, तक्रारदार महिलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याचा उपक्रम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाने राबविला. श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सन २०२५ व २०२६ मधील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा यासाठी आढावा घेण्यात आला.
या कालावधीत बलात्काराचे २५१ आणि विनयभंगाचे ६६६ असे एकूण ९१७ गुन्हे दाखल झाले होते. या सर्व प्रकरणांतील तक्रारदार महिलांशी संपर्क साधण्यासाठी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने प्रत्येक महिलेशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान आहे का, संबंधित आरोपीकडून पुन्हा त्रास दिला जात आहे का, तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत काही अडचणी आहेत का, याची माहिती घेतली.
या संवाद मोहिमेत ९१७ महिला व मुलींशी संपर्क साधण्यात आला. त्यापैकी ८४६ महिलांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले असून, संबंधित आरोपींकडून सध्या कोणताही त्रास नसल्याचे सांगितले. तर ७१ महिलांनी काही प्रमाणात त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या तक्रारींची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून संबंधितांवर आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा हा उपक्रम केवळ कारवाईपुरता मर्यादित न राहता पीडित महिलांच्या सुरक्षिततेचा सातत्याने पाठपुरावा करणारा ठरला आहे. पोलिसांच्या या प्रयत्नांवर ९३ टक्क्यांहून अधिक महिला तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले.
अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमांवरून कौतुक केले. महिला सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




Total Users : 670902