खंडाळा(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाच्या बारा जांभळी परिसरात दोन बिबट्यांमध्ये पाणी पिण्यावरून झालेल्या संघर्षात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वन्यजीवांच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,खंडाळा येथील बारा जांभळी परिसरात मेंढ्यांना पाणी पिण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून एक छोटेसे टाकीवजा तळे तयार करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मेंढ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येते. याच ठिकाणी काल पहाटेच्या सुमारास दोन बिबटे पाणी पिण्यासाठी आले होते. मात्र, पाणी पिण्यावरून त्यांच्यामध्ये अचानक संघर्ष सुरू झाला. दोन्ही बिबट्यांमध्ये जोरदार झटापट झाली. या संघर्षात मोठ्या बिबट्याने लहान बिबट्यावर हल्ला केला. या हल्ल्यात लहान बिबट्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकारी कानडे साहेब यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी त्याला वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले.या संपूर्ण मदतकार्यात खंडाळा गावातील सुजित डेंगळे, तुषार सदाफळ, अविनाश सदाफळ, प्रतीक सदाफळ, तेजस सदाफळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले.
वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय..
खंडाळा आणि परिसरातील शेतशिवारांमध्ये बिबट्यांचा वावर अनेकदा दिसून येतो. ग्रामीण भागात पाण्याच्या उपलब्धतेसाठी तयार करण्यात आलेल्या छोट्या तळ्यांवर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी शेतशिवारात जाताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
पाणी पिण्यासाठी आलेल्या दोन वन्यप्राण्यांमध्ये झालेल्या संघर्षात एका बिबट्याचा जीव गेल्याची ही घटना परिसरातील नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. वनविभागानेही परिसरातील वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करावे,अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.




Total Users : 678134