श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील वळदगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून शेतातील वीज मोटारी, सोलर मोटारी, सोलर पॅन तसेच केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील महिन्यात आठ मोटारी चोरीला गेल्यानंतर काल रात्री पुन्हा चार मोटारी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली जात आहे.
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उपलब्ध असलेल्या अत्यल्प पाण्यावर पिके जगविण्यासह गुरेढोरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतातील मोटारी व केबल चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. मोटारी चोरीला गेल्याने शेतीला पाणी देण्याची व्यवस्थाही विस्कळीत होत आहे.
या चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून येत्या आठ दिवसांत चोरीच्या घटनांचा तपास लागला नाही तर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी दिला आहे.यासंदर्भातील निवेदन बेलापूर आऊट पोस्टचे हेड कॉन्स्टेबल भिंगारदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, अशोक कारखान्याचे माजी संचालक विराज भोसले, बाळासाहेब मुंगसे, पोलीस पाटील शिवाजी भोसले, शरद नवले, अशोक भोसले, बाबासाहेब शेटे, मधुकर भोसले, शिवाजी माळी, जयकुमार धुमाळ, किशोर कांडेकर, अण्णासाहेब गार्डे, प्रकाश भोसले आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 682522