spot_img
spot_img

मिशन आरंभ’ने दाखवली गुणवत्तेची चमक! नवोदय सराव परीक्षेत ६ हजारांवर विद्यार्थी यशस्वी; नेवासा तालुका अव्वल

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मिशन आरंभ’ उपक्रमाला यश मिळाले आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत जिल्ह्यातील ९ हजार २८९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६ हजार ४४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेचा निकाल ६९ टक्के लागला असून, आठ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९७.५ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. २५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांमधील ८४७ जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी १०६ परीक्षा केंद्रांवर परीक्षेला बसले होते.

जवाहर नवोदय विद्यालयाची मुख्य प्रवेश परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावे आणि ओएमआर उत्तरपत्रिका भरण्याचा सराव व्हावा, या उद्देशाने ‘मिशन आरंभ’अंतर्गत सराव परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेत ९८० विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत ‘अ’ श्रेणी प्राप्त केली. तर ५६८ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक आणि १३७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे चित्र समोर आले आहे.

आठ विद्यार्थी जिल्ह्यात संयुक्त प्रथम

जिल्ह्यात ९७.५ टक्के गुण मिळवून

संयुक्त प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सम्यक कालू तपासे आणि साहिल सुनील बांबळे (पाचेधारवाडी, ता. अकोले), रोहन रंगनाथ परभणे (बाबुर्डी घुमट, ता. नगर), स्वरांजली दत्तात्रय तोडमल (चिलेखनवाडी, ता. नेवासा), अदिती लहू शिंदे आणि ईश्वरी शरद केसभट (बालमटाकळी, ता. शेवगाव), दिव्यांका निवृत्ती चौधरी (वडगाव लांडगा, ता. संगमनेर) आणि अक्षरा रामदास रेवगे (लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे.

गुणवत्तायादीत नेवासा तालुका आघाडीवर

जिल्हास्तरीय पहिल्या १०० गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत नेवासा तालुक्याने १८ विद्यार्थ्यांसह प्रथम स्थान मिळविले आहे. अकोले तालुक्यातील १५, कर्जत १३, श्रीगोंदा १२, कोपरगाव ११, संगमनेर १०, नगर ७, शेवगाव ६, पारनेर ५, जामखेड ३, पाथर्डी २ आणि राहुरी तालुक्यातील २ विद्यार्थ्यांचा या यादीत समावेश आहे.

गुणवत्ता यादी जाहीर

‘अ’ श्रेणीमध्ये कोपरगाव तालुका १४३ विद्यार्थ्यांसह आघाडीवर राहिला. तर ८४ टक्के निकालासह श्रीगोंदा तालुक्याने उत्तीर्णतेत अव्वल स्थान मिळविले. जिल्हास्तरीय पहिल्या १०० गुणवंतांसोबतच प्रत्येक तालुक्यातील पहिल्या ५० विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे.

विनोबा ॲपवर विद्यार्थ्यांचा निकाल

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. प्रत्येक शाळेचा आणि विद्यार्थ्याचा निकाल विनोबा ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे गुण, विषयानुसार कामगिरी आणि स्कॅन केलेली ओएमआर उत्तरपत्रिका पाहता येणार आहे. मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या कमकुवत विषयांवर विशेष सराव घेण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

यांनी केले अभिनंदन

या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि परीक्षेच्या नियोजनात सहभागी सर्व यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. तसेच २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुख्य प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!