शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):- श्री साईबाबांच्या पावन वास्तव्याने पवित्र झालेल्या द्वारकामाई मंदिरात तुळशी विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दरवर्षीच्या परंपरेनुसार यंदाही हा धार्मिक सोहळा मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
द्वारकामाई मंदिरात शनिवारी (दि. २२) सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) आणि त्यांच्या पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते तुळशी विवाह सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजनाने झाली. त्यानंतर तुळशी-विष्णू अभिषेक, विवाह संस्कार, आरती आदी धार्मिक विधी विधिवत पार पडले. यावेळी द्वारकामाई मंदिर परिसर भक्तांच्या उपस्थितीने आणि धार्मिक वातावरणाने भारावून गेला होता.
या प्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या तुळशी विवाह सोहळ्यामुळे द्वारकामाईत भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.




Total Users : 685901