राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा) :- राहुरी तालुक्यातील खडांबे (खुर्द) येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषी महाविद्यालय, विळद घाट येथील कृषिदूतांचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय, विळद घाट येथील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावात दाखल झाले असून, आगामी कालावधीत ते शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी विषयक प्रात्यक्षिके आणि विविध शासकीय योजनांची माहिती देणार आहेत.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सेक्रेटरी जनरल प्रा. डॉ. पांडुरंग गायकवाड, संचालक (तांत्रिक) प्रा. सुनील कल्हापुरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत, उपप्राचार्य प्रा. डॉ. हरिभाऊ शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. किरण दांगडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मिनीनाथ अनारसे व प्रा. डॉ. दीपिका मावळे तसेच विविध विषयांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सात कृषिदूत आकाश खामकर, धीरज कणसे, रवींद्र भुसावरे, अरविंद दराडे, धम्मदीप जावळे, अविनाश काळे आणि सत्यजित काळे हे विद्यार्थी शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमांतर्गत कृषिदूत शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या, अनुभव आणि गरजा जाणून घेऊन त्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये माती परीक्षण, फळबाग लागवड व व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, आधुनिक कृषी अवजारांचा वापर, शेतीचे आर्थिक नियोजन, पशुधन व्यवस्थापन व जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर प्रात्यक्षिके, चर्चा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
गावात कृषिदूतांचे आगमन झाल्यानंतर मा. सरपंच अण्णासाहेब माळी, उपसरपंच केदार पवार, ग्रामसेवक शिवाजी ढगे कृषी सहाय्यक . शिवाजी पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रगतशील शेतकरी शंकर कारले, संदीप कल्हापुरे,.शुभम शेळके, मकरंद कारले विजुभाऊ कल्हापुरे यांनी कृषिदूतांचे स्वागत केले.
ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमामुळे कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, शेती पद्धती आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार असून, विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यात ज्ञान व अनुभवांची देवाणघेवाण घडून येणार आहे.




Total Users : 686759