अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा ):- जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असून त्याचा मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि भवितव्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. सन २०३० पर्यंत देश बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प असून, २०२६ पर्यंत बालविवाहाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी दिल्या.
जिल्हा सरकारी रुग्णालयातील महिलांच्या आरोग्य सुविधा, प्रसूती सेवा, नवजात बालकांची सुरक्षा, स्वच्छता व अन्य सुविधांची पाहणी रहाटकर यांनी केली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील बालविवाहाच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी संजय कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुचिता यादव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जोखमीच्या मातांची वेळेत ओळख करा
गरोदर मातांच्या आरोग्य नोंदवह्यांची पाहणी करताना माहिती अद्ययावत असल्याचे दिसून आले. याबद्दल रहाटकर यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. जननी सुरक्षा योजना, १०२ रुग्णवाहिका सेवा तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचत आहे का, याची माहिती त्यांनी घेतली.
जोखमीच्या गरोदर मातांची वेळेत ओळख करून त्यांना आवश्यक उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
सायबर गुन्ह्यांपासून महिलांनी सावध राहावे
तंत्रज्ञानाच्या गैरवापरातून महिलांची फसवणूक आणि बदनामी करण्याच्या घटना वाढत आहेत. अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश आणि ऑनलाइन व्यवहार करताना महिलांनी अधिक सतर्क राहावे. सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती वाढविण्याची गरज असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.
याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील सायबर गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेतली.
रुग्णालयातील सुविधांवर समाधान
जिल्हा रुग्णालयातील उपचार सुविधा, कर्मचारी व्यवस्था, स्वच्छता आणि रुग्णसेवेचा दर्जा याबाबत रहाटकर यांनी समाधान व्यक्त केले. नवजात बालकांची सुरक्षा, मातांसाठी उपलब्ध सुविधा आणि रुग्णालयातील व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.




Total Users : 686757