spot_img
spot_img

मेसेज पाठविल्याच्या कारणावरून तरुणाचे अपहरण; जंगलात नेऊन अमानुष मारहाण कर्जत तालुक्यातील घटना; चिंचोली काळदात ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, आरोपींच्या अटकेची मागणी

कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा):- वर्गातील विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या अर्जाबाबत संदेश पाठविल्याच्या कारणावरून एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करून त्याला जंगलात नेऊन लाकडी दांडके, साखळी आणि चैनने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली. या घटनेच्या निषेधार्थ चिंचोली काळदात येथील संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी कर्जत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

या प्रकरणी अनिकेत अनिल काळदाते (वय १९, रा. चिंचोली काळदात) याने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिकेत हा दादा पाटील महाविद्यालयात एस.वाय. बी.सी.एस. वर्गात शिक्षण घेत आहे.

फिर्यादीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास महाविद्यालयातून पेपर देऊन बाहेर पडत असताना दोन तरुणांनी त्याला अडविले. त्यातील एका तरुणाने आपली ओळख आकाश तोरडमल अशी सांगत त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर पठारवाडी फाट्यामार्गे बहीरोबावाडी येथील जंगल परिसरात नेण्यात आले.

तेथे आणखी काही तरुण आले. ‘‘तू आमच्या मुलीला मेसेज का केला?’’ असा जाब विचारत आरोपींनी अनिकेतला लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने आणि चैनने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीरावर जखमा झाल्या आहेत.

आरोपींनी मारहाणीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले तसेच ‘‘तुझा संतोष देशमुख करतो,’’ अशी धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी गणेश विलास तोरडमल याने गळ्यातील सोन्याचे बदाम ओरबाडून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर अनिकेतने घर गाठले. त्याच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी कर्जत पोलिसांनी आकाश तोरडमल, गणेश विलास तोरडमल, विटेकर (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) आणि अन्य ७ ते ८ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ भिताडे करत आहेत.

आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

या घटनेनंतर चिंचोली काळदात येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. ग्रामस्थांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

गोरगरीब कुटुंबातील तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष रघु आबा काळदाते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप काळदाते, भाजप नेते व उपसरपंच गणेश काळदाते, सुनील पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!