नेवासा तालुका( जनता आवाज वृत्तसेवा ):– ५० एमसीएफटी पाणी उपलब्ध करून नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाईसह पंचक्रोशीतील गावांचा वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई गावासह पंचक्रोशीतील गावांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांच्या पुढाकारातून गुरुवार दि.२६ नोव्हेंबर ररोजी मंत्रालय,मुंबई येथे जलसंपदा विभागाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शिंगवे तुकाई येथील ग्रामस्थांचे जम्बो शिष्टमंडळ उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्याशिंगवे तुकाई ग्रामस्थांनी नुकतेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले होते. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
दिलेल्या शब्दानुसार अवघ्या आठवडाभरात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत ५० एमसीएफटी पाणी उपलब्ध करून थेट शिंगवे तुकाई, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, राजेगाव यांसह इतर गावांना पाणी देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंगवे तुकाईसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
बैठकीस पांडुरंग होंडे,सतीश थोरात,योगेश होंडे, दीपक पवार, ज्ञानेश्वर पुंड, , ज्ञानदेव पवार, गणेश दिघे, , बाळासाहेब गवळी, राजू पाटील होंडे, भाऊसाहेब होंडे, उद्धव होंडे,विठ्ठल पवार,संतोष थोरात, विजय थोरात यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.




Total Users : 688247