spot_img
spot_img

ऊसदराचा तिढा अखेर सुटला; पहिली उचल ३२५०, अंतिम दर ३४५० रुपये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकरी संघटना-साखर कारखानदारांमध्ये सहमती; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात गाजत असलेल्या गाळप ऊसदराच्या प्रश्नावर अखेर शुक्रवारी तोडगा निघाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये प्रतिटन ३ हजार ४५० रुपये अंतिम ऊसदर निश्चित करण्यावर एकमत झाले. त्यानुसार पहिली उचल ३ हजार २५० रुपये, त्यानंतर मार्चमध्ये १०० रुपये आणि नोव्हेंबरपर्यंत साखरेचे दर स्थिर राहिल्यास आणखी १०० रुपये देण्याचे ठरले. या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारपासूनचे आंदोलन मागे घेतले.

ऑक्टोबरपासून जिल्ह्यात गाळप हंगाम सुरू झाला असला तरी बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला नव्हता. काही कारखान्यांनी दर जाहीर केले; मात्र तो शेतकरी संघटनांनी नाकारला. त्यानंतर श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, शेवगावसह विविध भागांत आंदोलने झाली. यापूर्वी पालकमंत्री विखे यांनी दोन बैठका घेतल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या बैठकीत दोन्ही बाजूंची भूमिका जाणून घेत अखेर सामंजस्याचा मार्ग काढण्यात आला.

बैठकीत शेतकरी संघटनांनी किमान ३ हजार ७०० रुपयांच्या पहिल्या उचलीची मागणी कायम ठेवली होती. त्यानंतर कारखानदारांशी स्वतंत्र चर्चा करून ‘सोलापूर फॉर्म्युला’ स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात किमान ३ हजार ४५० रुपये ऊसदर निश्चित करण्यात आला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यातील साखरेचा उतारा कोल्हापूरपेक्षा कमी असल्याने सोलापूरचा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला. भविष्यात साखरेचे दर वाढल्यास कायद्यानुसार त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल.”

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “आमची ३ हजार ७०० रुपयांच्या किमान दराची मागणी होती. मात्र चर्चेनंतर ३ हजार ४५० रुपयांच्या सूत्रावर सहमती झाली असून शनिवारपासूनचे आंदोलन मागे घेत आहे.”

बैठकीला यांची उपस्थिती

बैठकीला आमदार मोनिका राजळे, आशुतोष काळे, विक्रम पाचपुते, माजी आमदार चंद्रशेखर घुले, कारखानदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र नागवडे, सीताराम गायकर, काकासाहेब नरवडे, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी अभिजित पोटे, रवींद्र मोरे, अनिल घनवट, दत्ता फुंदे, संभाजी माळवदे, प्रताप चिंधे, अनिल इंगळे, अंकुश काळे, मच्छिंद्र आरले, महादेव आव्हाट, बाळासाहेब फटागरे, जितेंद्र भोसले, संजय वाघ, प्रकाश देठे, सुरेश टाके उपस्थित होते.

तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि साखर सहसंचालक गणेश पुरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीसाठी सुरुवातीला केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात आल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. अन्य शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी रोखल्याने अनिल घनवट, मच्छिंद्र आरले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. घोषणाबाजीनंतर अखेर त्यांनाही बैठकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!