शिर्डी दि.२६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घरबसल्या मिळवून देणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शिर्डी येथे संपन्न झालेला जिल्हास्तरीय कार्यक्रम राज्यात लक्षवेधी ठरला आहे.जिल्यात शासनाच्या योजनांची होत असलेली प्रभावी अंमलबजावणी दाखवून देणारा उपक्रम खर्या अर्थाने एक उच्चांक ठरला आहे. जिल्ह्यातून २४ लाख ५० हजार लाभार्थ्यांची नोंद होवून या लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटी रूपयांचा लाभ देणारे गतिमान सरकार नागरीकांच्या घरापर्यत योजना घेवून पोहचत असल्याने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश यशस्वी होत असल्याचे पाहायला मिळाले.
नगर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील काही महीन्यापासून प्रत्येक तालुक्यात शासन आपल्या दारी उपक्रमातून नागरीकांचे प्रश्न तसेच योजनांच्या लाभाबाबतचा आढावा घेण्याचे काम सुरू केले.याचा परीणाम जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थींची विक्रमी
संख्या विविध योजनांसाठी नोंदली गेली.प्रशासन कसे हलावायचे आणि लोकांपर्यत कसे पोहचायचे याचा अनेक वर्षाचा असलेला अनुभव असलेल्या विखे पाटलांनी शासन आपल्या दारी उपक्रमाची नेमकी संधी हेरली आणि शासन लोकापर्यत पोहचवले याचा अनुभव सध्या जिल्ह्यातील नागरीक घेत आहेत.
शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमात जिल्ह्यातून ४० हजारांहून अधिक लाभार्थी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. यामुळे जिल्ह्यातील वाड्या-वस्त्या, गाव-खेड्यातून आलेल्या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी पोहचण्यास कोणताही त्रास झाला नाही. लाभार्थ्यांसाठी नास्ता, जेवण, पिण्याचे पाण्याची सुविधा एस.टी महामंडळाच्या बसेस मध्येच उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच प्रत्येक बसमध्ये आरोग्य पथक ही तैनात करण्यात आली होती. लाभार्थ्यांनी यामुळे समाधान व्यक्त केले.
शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात महसूल विभागाच्या माध्यमातून ४ लाख ७ हजार , पशुसंवर्धन विभागामार्फत २ लाख ६१ हजार , जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत ४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला. विविध महामंडळाच्या ५०० लाभार्थ्यांना १३ कोटीचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत १७ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना २२ कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात १९३ छोट्या मोठ्या उद्योगांना साडेसात कोटींची सबसिडी उपलब्ध करून दिली आहे. यामाध्यमातून एक हजार युवा-युवतींना रोजगार उपलब्ध झाला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार मेळावा घेऊन ११३० तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनुकंपा तत्वावर जिल्ह्यात २३४ तरूणांना शासकीय नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील काही प्रातिनिधिक तरूणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ११ लाख ७५ हजार शेतकरी सहभागी झाले. कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून ४ हजार ८०० शेतकऱ्यांना ३३ कोटी रूपयांची अवजारे देण्यात आली. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना ४ हजार ६३ कोटींचा कृषी कर्ज देण्यात आले आहे. सप्टेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी नुकसानीसाठी जिल्ह्यात २८१ कोटी रूपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पात जिल्ह्यातून १५६५ एकर जागेत ६५१ मेगॉवट वीजेचा प्रकल्प सुरू होणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे हे फलित आहे असे म्हणता येईल.
गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात केले.
‘शासन आपल्या दारी’ योजनेची संकल्पनाच ही आहे की, मिशन मोडवर काम करायचे, सरकारच्या योजना सुरू असतात, लोकं त्या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण जोपर्यंत मिशन मोडवर सरकार आणि प्रशासन जात नाही. तोपर्यंत या योजनांचे सार्वत्रिकीकरण करता येत नाही. आणि म्हणून ज्यांच्या करिता योजना तयार केली आहे. त्यांच्यापर्यंत सरकारने पोहोचायचे आणि सांगायचे ही योजना तूझ्या करिता तयार करण्यात आली आहे. तू लाभार्थी आहे आणि तूझ्या करिता आम्ही योजना घेऊन आलो आहोत. यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम आहे. असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिग लवकरच सुरू होणार आहे. नागपूर-शिर्डी तसेच शिर्डी ते भरवीर पर्यंत समृध्दी महामार्गाची वाहतूक ही सुरू झाली आहे. अशा प्रकारे या परिसराचा चौफेर विकास होत आहे.असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले.
पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत १७० कोटी रूपये खर्च केले आहेत. लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लम्पी आजारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी शासन सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व हर घर जल या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांसाठी जांभळाचे रोप भेट देण्यात आले असून त्यांचे संगोपन करावे. असे आवाहन ही महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधिक स्वरूपात २५ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये बबनराव गोविंदराव कबाडी (पुणतांबा ता. राहता) वैभव चंद्रकांत कांबळे (चिखलनवाडी ता.नेवासा) सौरभ दादासाहेब दौले (नेवासा) जया भास्कर पालवे (सावेडी, अहमदनगर) प्रफुल्ल भाऊसाहेब साळवे (राहुरी), हिराबाई ज्ञानदेव हळनूर, (पुरंपूर ता. श्रीरामपूर) बालासाहेब नानासाहेब गव्हाणे (रांजणगाव देशमुख ता. कोपरगाव) सुधाकर घोरपडे (मुंगी ता. शेवगाव) पद्मा रोहिदास माळी, (कोपरगाव) भारती दीपक वाडेकर (संगमनेर) संजय नानाभाऊ कडूस (सारोळा ता. अहमदनगर), सीमा शब्बीर इनामदार (लोणी), मुक्ता अर्जुन धोत्रे (बाभळेश्वर ता. राहता), गोरख बाबुराव शिंदे (येळपणे ता. श्रीगोंदा), मिलिंद लक्ष्मण शिंदे (पिंपरखेड ता.जामखेड), लक्ष्मण मोघा केदार (चिकलठाणा ता. राहुरी), राधाबाई मोहन देशमुख (अकोले), सुभाष त्रिंबक साळवे (शेवगाव), दानिश सलीम तांबोळी (माळीवाडा, अहमदनगर), योगेश जगन्नाथ घोलप, मोहिनी वीरेश पाचपुते (काष्ठी ता. श्रीगोंदा), अंबिका मल्हार (पारनेर), शकुंतला अरविंद आहेर आणि विष्णू लक्ष्मण शिंगटे (वाघोली ता. शेवगाव) यांचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अहमदनगर जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पैठणीचा फेटा परिधान करून तसेच साईबाबांची मूर्ती, ज्ञानेश्वरील ग्रंथाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, टॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातून आलेल्या सरपंचाशी ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला.
जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः व्यासपीठावरून खाली येऊन शेतकऱ्यांना पॉवर टिलर व ट्रॅक्टर वाटप करण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांना महाडीबीटी योजनेत एका लाभार्थ्यांला मिळालेले हार्वेस्टिंग मशीन दिसले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या मशीनजवळ जाऊन मशीनची पाहणी केली व वैशिष्टये जाणून घेतले.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे अमोल शिंदे यांनी माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यामाध्यमातून जनकल्याण योजनांचा सर्वसामान्यांना लाभ दिला जात आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
एका छताखाली ८० शासकीय विभागांचे माहितीचे स्टॉल‘
शासन आपल्या दारी’ अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे ८० स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री तक्रार कक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारींची दाखल करून घेऊन त्यांना टोकन नंबर देण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागाने घेतलेल्या रोजगार मेळाव्यास तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



