श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा) :- मागील काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या श्रीगोंदा पोलीस ठाण्याची पुन्हा एकदा राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादा म्हस्के, नितीन गाडगे आणि राजेश जाधव या तिघांनी एका अपघात प्रकरणाशी संबंधित गुन्ह्याची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीनंतर सात हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले असल्याचे समोर आले.
याबाबत तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि आज दुपारी संबंधित ठिकाणी कारवाई करत सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना तिन्ही कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईनंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीदेखील श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाच स्वीकारताना कारवाईत सापडले होते. त्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, अशा घटनांवर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकाच वेळी तीन पोलीस कर्मचारी लाच स्वीकारताना पकडले जाण्याची ही श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या इतिहासातील बहुधा पहिलीच घटना मानली जात असून, या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.




Total Users : 604782