नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा) :– नेवासा नगरपंचायतीविरोधात सोशल मीडियावर कथितपणे तथ्यहीन व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करून नगरपंचायतीची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत संबंधित युट्यूब चॅनेलवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी नेवासा पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर त्या युट्यूब चॅनलच्या समर्थनार्थ पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनानंतर शहरासह राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नगरसेवक डॉ. मनीषा वाघ, मेघा सरकाळे, अनिल पवार आणि अंकुश म्हस्के यांनी नेवासा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित कथित न्यूज चॅनेलची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर संबंधितांकडूनही पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून, युट्यूब चॅनेल संदर्भातील तक्रारींची चौकशी चार-पाच दिवसांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ‘जनता आवाज’शी बोलताना दिली.
“युट्यूब चॅनेल संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. दोन्ही बाजुने अर्ज आलेले आहेत. या प्रकरणाची सर्व बाजूंनी तपासणी करण्यात येत आहे. चौकशी चार-पाच दिवसांत पूर्ण करण्यात येईल. चौकशीत जे तथ्य समोर येतील, त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी “दैनिक जनता आवाज “शी बोलताना दिली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर मर्यादांची तपासणी गरजेची
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र या अधिकाराचा वापर करताना दुसऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा, सामाजिक सलोखा आणि कायदेशीर हक्क बाधित होत नाहीत ना, याची तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य कितपत आहे, बातम्यांचे स्रोत काय आहेत, कोणत्या पद्धतीने माहिती मिळविण्यात आली, तसेच संवेदनशील विषयांवर वृत्त प्रसिद्ध करताना कायदेशीर नियमांचे पालन झाले आहे का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
स्वीय सहाय्यकाच्या भूमिकेची चर्चा
या प्रकरणात तालुक्यातील एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित युट्यूब चॅनेल प्रतिनिधींनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाच्या प्रती काही पत्रकारांना पाठविणे आणि त्या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा पत्रकार व नागरिकांमध्ये सुरू आहे. या संदर्भातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्याची चर्चा होत आहे.
राजकीय दबावापासून तपास दूर ठेवण्याची मागणी
या प्रकरणाच्या तपासावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव येऊ नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तपास निष्पक्षपणे होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तक्रारींची सत्यता, संबंधित व्यक्तींची भूमिका, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडिया प्रसारणाची पद्धत यांचा तपास केल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
राजकारण नको, सत्य समोर यावे
एखाद्या व्यक्तीविरोधात तक्रार असल्यास त्याची सत्यता प्रशासनाने तपासणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत राजकारण आणून तपासावर परिणाम होऊ नये. आज एखाद्याची वेळ आहे, उद्या हीच परिस्थिती कोणावरही येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी न्यायाच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे. सायबर तपासाची गरज
युट्यूब व सोशल मीडिया संदर्भातील प्रकरण असल्याने सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तांत्रिक तपास करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. बातम्यांचे डिजिटल पुरावे, प्रसारणाची पद्धत आणि संबंधितांची भूमिका तपासल्यास सत्य समोर येण्यास मदत होईल.




Total Users : 604686