टाकळीभान,( जनता आवाज वृत्तसेवा ):-टाकळीभान येथील ग्रामसभा पाणी प्रश्न व घरकुल प्रश्नावर महिलांनी हल्लाबोल करीत चांगलीच गाजविली आहे.
१५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात न आल्याने आज आयोजित केलेल्या ग्रामसभेला महिला व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. ग्रामसभा सुरू होताच सर्वच प्रभागातून आलेल्या महिलांनी माईकचा ताबा घेवून पाणी प्रश्न व घरकुल प्रश्नावर हल्लाबोल करीत सारा परिसर दणाणून टाकला तर बापूसाहेब नवले यांनी हंडा, कळशी आणून ग्रामसभेत प्रवेश केला व या भांड्यांचा आवाज करून पाणी द्या पाणीद्या अशी मागणी केली व तुम्हाला पाणी देता येत नसेल तर नैतीक जबाबदारी म्हणून सर्व सदस्यांनी राजीनामे देण्याची मागणी केली. प्रथमच ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात महिलांनी हजेरी लावून पाणी प्रश्नावर हल्लाबोल केला.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी बोलतांना माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की, आज लोकांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.लोकांना पिण्याचे पाणी उपल्बध करून देणेकामी ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने अगोदर ग्रामपंचायतीने प्राधान्याने येथील जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थितरित्या करावा असे आवाहन नानासाहेब पवार यांनी केले. यावेळी अशोकचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, अशोकचे कारेगाव भाग संचालक शिवाजी शिंदे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, माजी उपसरपंच भारत भवार, पाराजी पटारे,अविनाश लोखंडे, प्रा.जयकर मगर, यशवंत रणनवरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पवार पुढे म्हणाले की, चार वर्षापासून आपली चारशे घरकुले रखडली आहे. त्यातली फक्त ११५ घरकुले झाली असून बाकी घरकुले होणे बाकी आहे. महाराष्र्ट शासनाने या घरकुलाबाबत स्वत:ची जागा पाहीजे अशी अट घातल्याने काही लोकांची घरकुल राहीले. या घरकुला संदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत घरकुल आहे त्याच जागेवर बांधून मिळाले पाहीजे अशी चर्चा त्यांच्या बरोबर झाली असून लवकरात लवकर महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना टाकळीभान येथे आणून २०० घरकुलांचे कामांचे उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
माजी सरपंच मंजाबापू थोरात म्हणाले की, टाकळीभान टेलटॅंकमध्ये मागे झालेल्या आवर्तनातून पाणी सोडण्यात आले. म्हणून आज या टेलटॅंक मध्ये पाणी आहे. जर हे पाणी मिळाले नसते तर हा टॅंक कोरडा असता. त्यामुळे भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य लक्षात घेता भंडारदरा धरणाच्या खाली होणार्या पावसाचे पाणी तसेच धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून टाकळीभान टेलटॅंक अगोदर भरून घ्यावा. व नंतर निळवंडे धरण भरण्यात यावे असा ठराव मांडला. याबाबत येथील पत्रकारांनी सुध्दा वर्तमान पत्रातून लिखाण करण्याचे आवाहन करून जलजीवन साठी केंद्राचा निधी असतो मात्र अनेक सरपंच व सदस्यांना टक्केवारी किती भेटेल? आपल्याला किती वाटा भेटेल? या विचारात ते मग्न आहेत. सरपंचा बाबत माझे काही मत नाही मात्र त्यांचे कान भरवणारी चांडाळ चौकडी आहे. त्यांच्यावर लक्ष द्यावे लागेल असे सांगून ग्रामपंचायतीत सत्ता यावी म्हणून आपण सर्वांनीच एकत्र येवून काम केले मात्र काही जणांनी सत्ता येताच आमचाच पत्ता कट केला असल्याचे थोरात म्हणाले.
उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सध्यस्थितीत येथील बाजारसमितीकडे असणारी बाकी वसूल करण्यात यावी. तसेच पेठेतून गेलेल्या मेनलाईनला अनधिकृत नळ कनेक्शन आहे. ते कन्केशन बंद करावे किंवा त्यांच्यावर कारवाई करावी. जेणेकरून बाकी लोकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. तसेच येथील बाजार समितीस १२० गुंठे म्हणजेच तीन एकर जागा आहे. तीची मोजणी करण्यात येवून वाढीव असलेली जागा काढून घेण्यात यावी असे सांगून त्यांनी घरकुल प्रश्नाबाबत प्रांताधिकारी व तहसिलदार येथे येवून पहाणी करणार असून त्यानंतर घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगितले.
यावेळी राहुल पटारे यांनी विकासकामे होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत येथे फक्त सत्ताधार्यांमधील काही लोकांकडून एखाद्याच्या वैयक्तीक आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला जातो. हे खेदजनक असल्याचे सांगीतले.
माजी उपसरपंच पाराजी पटारे यांनी अहमदनगर जिल्हा हा दुष्काग्रस्त जाहीर करावा तसेच सलग पंधरा दिवस पावसाचा खंड पडल्याने पिक विमा सर्वेक्शन करण्याचे त्यांनी सूचविले.
यावेळी नारायण काळे, बापूसाहेब शिंदे, अनिल बोडखे, आण्णासाहेब दाभाडे, बापू नवले, रामभाऊ आरगडे, सुप्रिया धुमाळ, देवा कोकणे, संजय रणनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांना ग्रामविकास अधिकारी आर.एफ.जाधव यांनी उत्तरे दिली.
यावेळी विलास दाभाडे, भाऊसाहेब पटारे, भाऊसाहेब पवार, आबासाहेब रणनवरे, अनिल पटारे, रघूनाथ शिंदे, महेंद्र संत, प्रकाश धुमाळ, संजय रणनवरे, रमेश पटारे, अनिल बोडखे, महावितरणचे कैलास घोळवे, पशूवैद्यकीय डाॅ.कोकणे, सुरेश वाघुले, दत्तात्रय मगर, मारूती पटारे आदी उपस्थित होते.
या ग्रामसभेत पहिल्यांदाच महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून आपल्या समस्यांचा पाढाच या ठिकाणी वाचून दाखविला. प्रत्येक वार्डातून आपआपल्या अडचणी घेवून महिला वर्ग या ठिकाणी सत्ताधार्यांना जाब विचारण्यासाठी आल्या होत्या.



