नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा शहरातील सदाशिवनगरात पारमार्थिक व निवृत्त विमा विकासाधिकारी प्रदीपराव औटी यांच्या निवासस्थानी श्रीमद्भागवत कथा सप्ताह १ सप्टेंबर पासून चालू आहे . या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील तिखी येथील ललितादेवी मंदीर संस्थानाचे महंत भागवताचार्य धनंजय महाराज देशपांडे यांच्या सुमधुर वाणीतील कथा ऐकण्याची सुवर्णसंधी भाविकांना प्राप्त झाली आहे .
” इश्वराचा कर्माशी काहीही संबंध नाही. पण भोग भोगतानाही जो नामस्मरण करतो तो देवाला आवडतो.भगवंताने आपल्यावर प्रेम करावे म्हणून नामस्मरण करावे ” असे सांगताना त्यांनी भक्त प्रल्हादाची कथा सांगितली.
ते म्हणाले,” प्रल्हादाची आई कयाधू हिचे हरण इद्राने केले तेंव्हा देवर्षि नारदांनी त्याचे मतपरिवर्तन केले. प्रल्हादाचा गर्भ पोटात असलेली कयाधू नारदांच्या आश्रमात काही काळ राहिली. नारायण नारायण या नामस्मरणाचा संस्कार त्या गर्भावर झाला आणि प्रल्हादाला नामस्मरणाची गोडी लागली. वडील हिरण्यकश्यपूने विरोध केला, त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले तरीही प्रल्हादाला मरण येत नाही, हे पाहून हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, तुझा नारायण कोठे आहे ? प्रल्हादाने सांगितले, तो सर्वत्र आहे . या खांबातही आहे. हे ऐकताच हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारल्यावर भगवंत नरसिंह रुपात प्रकट झाले. भोग भोगतानाही प्रल्हादाचे नामस्मरण चालू होते म्हणूनच तो देवांचा लाडका भक्त बनला आणि त्याच्या रक्षणासाठी धावला . याचप्रमाणे मगरीने पकडलेल्या गजेंद्रालाही त्याने मुक्त केले. भगवंत सर्वत्र आहे, तो आपल्या भोवतीच वावरत असतो, याची जाणीव ठेवा. भगवंताचा अनुभव हत्तीला येतो तर माणसाला का नाही येणार ?”
कथेला हार्मोनियम वादक पंडित महेंद्र बोरसे, तबला वादक पंडित मुकुंद गुरव यांनी अधिक माधुर्य आणले आहे. गोंदवलेकर महाराज उपासना केंद्राचे सर्व साधक सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी सेवा देत आहेत.




Total Users : 631755