कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) : – वैजापूर – श्रीरामपूर ( वारी, शिंगवे, पुणतांबा मार्गे ) बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नुकतीच वैजापूर आगार प्रमुख किरण धनवटे यांना निवेदन देत केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले, कोपरगाव तालुक्यातील वारी, भोजडे, धोत्रे व तळेगाव मळे व राहाता तालुक्यातील शिंगवे या मार्गे वैजापूर आगारची श्रीरामपूरकडे बससेवा सुरु होती. त्यामध्ये वैजापूर व श्रीरामपूरकडे दररोज दोन्ही बाजूने जवळपास सहा फेऱ्या मारत होती. परंतु; गेल्या काही वर्षापासून ही सेवा पूर्णतः बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. अशातच वरील सर्वच गावांची लोकसंख्या चांगली असून यामध्ये विध्यार्थी, व्यापारी, नोकरदार, शिक्षक, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. कामानिमित वैजापूर – श्रीरामपूरकड़े दररोज जातच असतात. त्याचबरोबर वारी गावात सोमैया उद्योग समूहाचा मोठा कारखाना असल्याने येथे कामगारांची संख्या मोठी आहे. यातील बहुतांश कामगार हे श्रीरामपूर तसेच वैजापूर येथून दररोज खासगी वाहनाने प्रवास करतात. अशातच राज्य शासनाणे देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षापुढील जेष्ठांना बस प्रवास पूर्णतः मोफत केला आहे. तर महिलांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. यावेळी टेके पाटील ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टेके, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, पत्रकार किशोर साळुंखे उपस्थित होते.



