spot_img
spot_img

कोल्हार भगवतीपूर येथे ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा प्रारंभ

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा)  :- कोल्हार भगवतीपूर येथे पुरुषोत्तम मास ( अधिकमास ) निमित्त श्री भगवतीदेवी मंदिर परिसरात काल रविवार दि. २३ पासून ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला. गावामध्ये एवढ्या अतिभव्य स्वरुपात प्रथमच ऐतिहासिक साप्ताह होत असल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरले आहे. त्याअनुषंगाने नियोजन समिती, देवालय ट्रस्ट व ग्रामस्थांकडून मोठी तयारी करण्यात आली. 
रविवार दि. २३ जुलै ते रविवार दि. ३० जुलै २०२३ या कालावधीत हा सोहळा संपन्न होत असून रात्री ७ ते १० वाजता श्रीक्षेत्र गोदावरीधाम, सराला बेटाचे पिठाधिश्वर गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना श्रीमद् भागवत कथा होत आहे. भाविकांना कथा श्रवणासाठी २०५ बाय ९० फुटाचा अतिभव्य वॉटरप्रुफ शामियाना उभारण्यात आला आहे.  
काल रविवारी सकाळी प्रारंभी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे व त्यांच्या पत्नी सौ. शीतलताई सुरेंद्र खर्डे तसेच भगवतीपूरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे व त्यांच्या पत्नी सौ. मथुराबाई रावसाहेब खर्डे या दाम्पत्यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. यथाविधी पूजन झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 
यावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील अधिकमासाचे महात्म्य विषद करीत म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातल्या त्यात अहमदनगर जिल्ह्याला संत परंपरा व धार्मिक तीर्थक्षेत्रांचे अधिष्ठान लाभलेले आहे. कोल्हार भगवतीपूर या आदिशक्तीचे साडेतीन शक्तीपिठांचे अधिष्ठान लाभलेल्या तीर्थक्षेत्री हा भव्य सोहळा होत असल्याने याचे अनन्यसाधारण महत्व आहे. सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असल्यामुळे ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 
व्यासपीठचालक नवनाथ महाराज म्हस्के व भगवान महाराज डमाळे तसेच भजनी मंडळ यांच्या वाणीतून पंचपती भजन होऊन विणेकरी यांना वीणा सुपूर्द करून ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ झाला. यावेळी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
दुपारी ४ वाजता गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांचे मिरवणूकीने स्वागत करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीस सुरुवात झाली. अश्व रथामध्ये रामगिरीजी महाराज विराजमान होते. ढोलताशा, सनई चौघड्याच्या स्वरात टाळ मृदुंगाच्या मंगलमय गजरात भजन करीत मिरवणूक निघाली. डोक्यावर मंगलकलश घेत मिरवणुकीत महिला सहभागी होत्या. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मिरवणूक श्री भगवतीदेवी मंदिरापर्यंत आल्यानंतर महाआरती होत रात्री श्रीमद् भागवत कथा झाली. यावेळी मोठ्या संख्येने श्रोतेगण भाविक उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!