spot_img
spot_img

समन्वयीचे विधेयक तुम्हीच मांडले आता विरोधाची भाषा का? – मंत्री विखे पा. पुढील वर्षाकरिता 3000 रुपये भाव देण्याची विखें पा. घोषणा विरोधकांना मोकळे सोडणार नाही -खा. डॉ. सुजय विखे पाटील

लोणी दि. ३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-समन्‍यायी पाणी वाटप कायद्याचे विधेयक सभागृहात मांडून जिल्‍ह्याचे हक्‍काचे पाणी सोडण्‍यास समर्थन देणारेच आज पाणी सोडण्‍यास विरोध केल्‍याची भाषा करु लागले असले तरी, जिल्‍ह्याच्‍या मानगुटीवर बसविलेल्‍या या कायद्याच्‍या पापाची जबाबदारी तुम्‍हाला टाळता येणार नाही अशी परखड टिका महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील केली.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कैलास तांबे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ.भास्‍करराव खर्डे, ट्रस्क सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, व्‍हा.चेअरमन सतिष ससाणे, मच्छिंद्र थेटे यांच्‍यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. या सभेत कारखान्‍याच्‍या वतीने विकसीत करण्‍यात आलेल्‍या प्रवरा किसान ॲपचे  विमोचन मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच सर्व विषयांना सभेने एकमताने मंजुरी दिली.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, यंदा धरणं भरली असली तरी पावसाची चिंता संपलेली नाही. मराठवाड्याला पाणी देण्‍याबाबतची टांगती तलवार आपल्‍यावर कायम आहे. ज्‍यांनी समन्‍यायी पाणी वाटप कायद्याचे भूत जिल्‍ह्याच्‍या मानगुटीवर बसविले तेच आता मी पहिल्‍यांदा विरोध केल्‍याची भाषा बोलू लागले आहेत याचे आश्‍चर्य वाटते. परंतू पाणी सोडण्‍याला तुम्‍ही समर्थन दिले हा इतिहास का विसरता असा सवाल करुन, जाणत्‍या राज्‍याच्‍या उपस्थितीत पाणी सोडण्‍यास दिलेल्‍या मान्‍यतेचे दाखले त्‍यांनी सभेत सभासदांना दाखविले.

तत्‍कालिन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी ५० हजार कोटी रुपयांच्‍या नदीजोड प्रकल्‍पाला तत्‍वत: मान्‍यता दिली होती. पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरी तुटीच्‍या खो-यात येण्‍याचा मार्ग सुकर झाला होता. परंतू आघाडी सरकारच्‍या अडीच वर्षांच्‍या काळात हेच मंत्री होते परंतू त्‍यांनी याबाबत चकार शब्‍दही काढला नाही, याबाबत कधी एक विधानही केले नाही. तेच आता समन्‍यायी पाणी वाटप कायद्याच्‍या बाबतीत विरोधाची भाषा बोलू लागले आहेत परंतू या कायद्याचे पाप जिल्‍ह्यावर तुम्‍हीच लादले असल्‍याने तुम्‍हाला याची जबाबदार टाळता येणार नाही अशी खरमरीत टिका ना.विखे पाटील यांनी केली.

केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून सहकारी साखर कारखानदारीला स्‍थैर्य देण्‍याचे मोठे काम होत आहे. शेतक-यांच्‍या जीवनात सरकारच्‍या धोणामुळे अमुलाग्र बदल होत आहेत, केंद्र सरकारने कारखान्‍यांवरील इनकमटॅक्‍सचा बोजा माफ करण्‍याचा निर्णय केल्‍यामुळेच ऊस उत्‍पादक शेतक-यांना आज जादा भाव देण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ वर्षे जाणते राजे केंद्रात मंत्री होते, परंतू फक्‍त शिष्‍टमंडळाच्‍या चकरा सुरु होत्‍या. देशात प्रथमच सहकार मंत्रालय स्‍थापन झाल्‍यानंतर हे प्रश्‍न निकाली निघत आहेत. इथेनॉल धोरणामुळे कारखान्‍यांना आर्थिक मदत होवू लागली आहे. डॉ.विखे पाटील कारखान्‍यानेही आता यंदाच्‍या वर्षापासून ज्‍यूस पासून इथेनॉल तयार करण्‍याचा प्रकल्‍प कार्यान्वित केला आहे. राज्‍यात असा प्रकल्‍प करणारा आपला कारखाना पहिला असून, सहकारात ही नवी क्रांती ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

यंदाच्‍या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी, उपलब्‍ध पाण्‍याचा उपयोग करुन ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात हाती घ्‍यावी. यासाठी कारखान्‍याने अमृत कलश योजना जाहीर केली असून, पुढच्‍या वर्षीचा ३ हजार रुपये भाव आपण चार महिन्‍यांपुर्वीच जाहीर केला आहे. कारखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रात तसेच मतदार संघात विकासाची प्रक्रीया कधीही थांबली नाही, तुमच्‍या सर्वांच्‍या आशिर्वादाने राज्‍याच्‍या मंत्रीमंडळात काम करण्‍याची संधी मिळाल्‍याने शिर्डी आणि नगर येथे औद्योगिक वसाहत उभारणी करण्‍याचा निर्णय करता आला. जिल्‍ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याचे आपले धोरण असून, शिर्डी येथील अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी कार्यालय तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालय या विकासाच्‍या बाबी जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी मोठ्या उपलब्‍धी ठरणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपरोधीक भाषण करुन, विरोधकांना शालजोडे मारले. ज्‍यांचे एक रुपयांचे योगदान नाही ते आपल्‍या विरोधात गप्‍पा मारतात, त्‍यांच्‍या विरोधात आपल्‍याला काही बोलायचे नाही. उलट आता मी चिंतामुक्‍त झालो असल्‍याने चांगले काम करीत राहणार आहे. आदरणीय खासदार साहेबांनी मला राजकारणात कोणालाच मोकळे सोडायचे नसते ही शिवकण दिली, त्‍याचा योग्‍य उपयोग मी आता करणार असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य त्‍यांनी केले.

माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी राजकारणामध्‍ये निंदकाचे घर असावे शेजारी हे लक्षात ठेवून पुढे जायचे असते. खासदार साहेबांनाही यापुर्वी विरोध झाला परंतू ते डगमगले नाहीत, राहून  गेलेल्‍या गोष्‍टींचा वापर सत्‍तेच्‍या माध्‍यमातून करायचा असतो ही भूमिका घेवून पुढे जावे लागेल. सहकार चळवळीतून मिळालेला नावलौकीक टिकवून ठेवण्‍यासाठी मिळालेल्‍या संधीचे सोने करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी चांद्रयानाची यशस्‍वी मोहीम जी२० परिषदेचे यशस्‍वी आयोजन आणि महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतल्‍याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या मांडलेल्‍या ठरावास तसेच ना.राधाकृष्‍ण विखे पाटील जिल्‍ह्याच्‍या विकासाकरीता घेतलेल्‍या निर्णयांबद्दल तसेच २७०० रुपये भाव दिल्‍याबद्दल अभिनंदनाचा अभिनंदनाच्‍या ठरावास उपस्थितांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.

मराठवाड्याला पाणी देण्‍यास विरोध नाही परंतू या कायद्याबाबत फेरविचार करण्‍यासाठी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे पाऊल टाकले आहे. या माध्‍यमातूनच दोन जिल्‍ह्यातील वाद कायमस्‍वरुपी मिटविण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न आहे. याबरोबरच पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात वळविण्‍याबाबत राज्‍य सरकारने घेतलेला निर्णय हा महत्‍वपूर्ण ठरेल असा विश्‍वास मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!