spot_img
spot_img

ठेकेदाराच्या भरोशावर योजनेची अंमलबजावणी नको- पालकमंत्री विखे पा. यांची अधिकाऱ्यांना ताकीद

लोणी दि.२३( जनता आवाज

वृत्तसेवा ):-जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्‍या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा आधिकार आहे. या योजनेच्‍या कामाची पूर्तता करताना नागरीकांना विश्‍वासात घ्‍या, ग्रामस्‍थांच्‍या सुचनांप्रमाणे योजनेच्‍या आराखड्यात पुन्‍हा बदल करा. योजनेच्‍या यशस्‍वीतेसाठी आधिका-यांनी सुध्‍दा जबाबदारीने काम करावे, केवळ ठेकेदारांच्‍या भरवश्‍यावर योजनेची अंमलबजावणी करु नका आणि जिल्‍हाधिकारी आणि मुख्‍य कार्यकारी आधिका-यांनी कामाच्‍या ठिकाणी अचानक भेटी देवून वस्‍तुस्थिती पाहावी अशा स्‍पष्‍ट सुचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिल्‍या.

    

राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी तालुक्‍यात सुरु असलेल्‍या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्‍या कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी आधिका-यांच्‍या उपस्थितीत घेतला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सोनवणे, सर्व विभागांचे प्रांताधिकारी, तहसिलदार आणि संस्‍थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी सर्वच तालुक्‍यातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा गावनिहाय घेतला. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांच्‍या योजनेच्या अंमलबजावणी बाबत असलेल्‍या तक्रारी जाणून घेत त्‍यांनी संबधित आधिका-यांना तातडीने सोडवणूक करण्‍याबाबत आदेश दिले. बहुतांशी गावांमध्‍ये ग्रामस्‍थाना विश्‍वासात न घेता योजनेचे काम सुरु असल्‍याच्‍या तक्रारी ग्रामस्‍थांनी केल्‍या ही अतिशय गंभिर बाब असून, याबाबत त्‍यांनी आधिका-यांना चांगलेच फटकारले. ठेकेदारांच्‍या भरवश्‍यावर योजनेची अंमबजावणी तुम्‍ही करणार का? असा प्रश्‍न मंत्री विखे पाटील यांनी आधिका-यांना केला.
 योजनेची अंमलबजावणी करताना अनेक गावांमध्‍ये ग्रामसभा झाल्‍या नाहीत, काही गावांमध्‍ये ग्रामसभेत केलेल्‍या ठरावा नुसार योजनेत कोणताही अंतर्भाव झालेला नाही. त्‍यामध्‍ये बदल करुन, आधिका-यांनी पुन्‍हा ग्रामस्‍थांच्‍या मागणी नुसार या योजनांची आराखडे तयार करावेत. मागणी प्रमाणे योजनेचा वाढीव प्रस्‍ताव असेल तर पुन्‍हा मंजुरीसाठी पाठवा अशा सुचनाही त्‍यांनी आधिका-यांना दिल्‍या.
 योजनेमध्‍ये वापरण्‍यात येणा-या पाईप बाबतही या बैठकीत तक्रारी करण्‍यात आल्‍या. एका ठरावीक कंपनीचेच पाईप वापरावे अशी सक्‍ती योजनेत कुठेही नाही असे स्‍पष्‍ट करुन, त्‍यांनी सांगितले की, योजनेच्‍या बाबतीत कुठलाही निर्णय करताना आधिकारी आणि कंत्राटदारांनी ग्रामस्थांना विश्‍वात घेवूनच करावा. सर्व योजनेच्‍या अंमलबजावणीसाठी पंचायत समिती आणि जीवन प्राधिकरणाच्‍या आधिका-यांनी एकत्रित समन्‍वय ठेवावा. या योजनेच्‍या यशस्‍वीतेसाठी जिल्‍हाधिकारी आणि मुख्‍य कार्यकारी आधिकारी यांनी कामे सुरु असलेल्‍या गावांमध्‍ये अचानक भेटी देवून कामांचा आढावा घ्‍यावा अशा सुचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्‍या आहेत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!